पहिले भरती, मग खुर्ची
By Admin | Updated: May 25, 2014 20:36 IST2014-05-24T00:34:54+5:302014-05-25T20:36:27+5:30
स्वच्छतेप्रश्नी सतर्कता : सिडकोच्या सभापतींनी पुकारला एल्गार

पहिले भरती, मग खुर्ची
स्वच्छतेप्रश्नी सतर्कता : सिडकोच्या सभापतींनी पुकारला एल्गार
सिडको : सात खेडी तसेच दाट लोकवस्तीचा भाग असलेल्या सिडको प्रभागात आरोग्य विभागात कामकाज करणार्या कर्मचार्यांची संख्या अत्यंत कमी आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न कायम निर्माण होत असून, मनपा आयुक्तांनी सदरची बाब गांभीर्याने घ्यावी यासाठी नवनियुक्त सिडको प्रभाग सभापती उत्तम दोंदे यांनी सभापती कार्यालयातील खुर्चीवर न बसता काम करण्याचे अनोखे आंदोलन आजपासून सुरू केले आहे. याबाबत आयुक्त काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सिडको विभागात एकूण ११ प्रभाग आहेत. तसेच सिडको ही अत्यंत दाट लोकसंख्या असलेली वसाहत आहे. याबरोबरच सात खेडी आहे. तसेच पाथर्डी, चुंचाळे, कामटवाडे, उंटवाडी या परिसराचाही समावेश आहे. या भागात लोकसंख्यादेखील झपाट्याने वाढत असून, आरोग्याच्या प्रश्नावर सर्वच नगरसेवकांकडून अधिकार्यांवर नाराजी व्यक्त केली जाते. कर्मचारी संख्या कमी असल्याने आरोग्य विभागाकडून संपूर्ण परिसराची साफसफाई होत नाही, तसेच ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. लोकसंख्येच्या आधारावर जर कर्मचारी संख्या बघितली, तर सिडको विभागाच्या सफाई कर्मचार्यांची संख्या अत्यंत कमी असल्याचे दिसून येते.
आरोग्य विभागामध्ये एक हजार लोकसंख्येला तीन कर्मचारी, तर तीन लाख लोकसंख्येला ९०० कर्मचारी आवश्यक आहेत; परंतु सिडको विभागात ११ प्रभागांसाठी केवळ ११७ सफाई कर्मचारी देण्यात आले आहेत. त्यामध्ये १० ते १५ कर्मचारी हे इतर विभागांत सोयीनुसार काम करीत असल्याचे प्रभाग सभापती उत्तम दोंदे यांनी सांगितले. मनपा आयुक्तांनी सफाई कर्मचार्यांबाबत समान नियोजन करून सिडको विभागात कर्मचारी संख्या वाढवावी अन्यथा खुर्चीवर न बसता कामकाज करण्याचा इशाराही सभापती दोंदे यांनी दिला आहे. (वार्ताहर)