नाशिक मुक्त विद्यापीठात पहिली ऑनलाइन पीएचडी परिक्षा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 18:24 IST2020-05-26T18:21:12+5:302020-05-26T18:24:28+5:30
विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या वतीने या परीक्षा घेण्यात आल्या. सध्या लॉक डाऊनमुळे पारंपरीक विद्यापीठातील कामकाज सध्या ठप्प झाले आहे

नाशिक मुक्त विद्यापीठात पहिली ऑनलाइन पीएचडी परिक्षा संपन्न
नाशिक : सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांचे कामकाज ठप्प झाले असताना नाशिक मधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने पीएचडीसाठी ऑनलाइन मौखिक परीक्षा घेतली
आणि तंत्रज्ञानाच्या वापराचा आगळावेगळा प्रयोग राबविला. राज्यात अशाप्रकारे परीक्षा घेणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरले आहे. विद्यापीठाच्या मानव्य विद्या आणि सामाजिक शास्त्र विद्याशाखेच्या वतीने या परीक्षा घेण्यात आल्या. सध्या लॉक डाऊनमुळे पारंपरीक विद्यापीठातील कामकाज सध्या ठप्प झाले आहे, अशावेळी नाशिकचे यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुुक्त विद्यापीठाच्या वतीने मात्र रेडीओ, ऑनलाइन व्हीडीओ लर्निंग सुविधेव्दारे महत्वाचे शिक्षण दिले जात आहे. त्यात आता विद्यापीठाने पीएचडीची तोंडी परीक्षा घेतली.महाराष्ट्र शासनाच्या सेवेत
सचिवपदी कार्यरत असलेले अतुल पाटणे यांनी लोकाभिमुख प्रशासनात अभिनवतेची भूमिका आणि महत्व - महाराष्ट्र शासनाच्या प्रगती अभियानासंदर्भात विशेष असा त्यांचा विषय होता. त्यांनी मुंबईहून तोंडी परीक्षा दिली. यावेळी
नाशिकमध्ये ही परीक्षा घेताना मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई वायुनंदन,मानव्य विद्याशाखेचे संचालक प्रा. उमेश राजदेरकर, डॉ. हेमंत राजगुरू , डॉ. मधूकर शेवाळे, डॉ. प्रविण घोडेस्वार, डॉ. नागार्जुन वाडेकर, डॉ. प्रकाश बर्वे आदी उपस्थित होते. या परीक्षेचे परीक्षक डॉ. श्रीमती शोभा कारेकर या पुण्यावरून, तर डॉ. बालाजी कत्तुरवार नांदेडहून सहभागी झाले
होते. यावेळी पाटणे यांनी १३५ स्लाईडव्दारे आपल्या विषयाचे सादरीकरण केले आणि आॅनलाईनच प्रश्नोत्तरे देखील झाली. सदरची परीक्षा खुली असल्याने चंदीगढ येथून आयएएस अधिकारी निलकंठ आव्हाड,
मुंबई येथील सहआयुक्त अर्चना कुलकर्णी, अकोला येथील शिक्षणतज्ज्ञ प्रा.संजय खक्कर, नागपूर येथून डॉ. संजय इंगोले, मुंबई येथून डॉ. नाखले,नांदेड येथूनच डॉ. मोहन यांच्यासह एकुण ३५ जण या परीक्षेत सहभागी झाले
होते. कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अभय कुलकर्णी आणि चंद्रकांत पवार यांनी तांत्रिक बाजु सांभाळली.