आधी शोक, मग टाळ्या

By Admin | Updated: August 12, 2014 01:47 IST2014-08-12T01:47:37+5:302014-08-12T01:47:57+5:30

आधी शोक, मग टाळ्या

First mourning, then applause | आधी शोक, मग टाळ्या

आधी शोक, मग टाळ्या

नाशिक : स्थानिक पातळीवर नगरसेवकांचे आप्तेष्ट तसेच राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील मान्यवर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सोमवारी महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांची नियुक्ती स्थगित करण्यात आली, तसेच अन्य महत्त्वाच्या विषयांवर चर्चाही झाली नाही. दुसरीकडे मात्र कॉँग्रेस गटनेत्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आली आणि बाके वाजवून अभिनंदन करण्यात आल्याने पालिकेच्या सभागृहाला खरोखरीच दु:ख झाले की नाही, असा प्रश्न निर्माण झाला.
पालिकेची मासिक महासभा सोमवारी सकाळी महापौरांनी बोलावली होती. या महासभेत महिला व बालकल्याण समितीचे सदस्य नियुक्त करण्याचा प्रस्ताव होता. त्याचबरोबर अन्य नागरी विकासकामांचेही प्रस्ताव होते. तथापि, नगरसेवक डॉ. विशाल घोलप यांचे वडील पद्माकर घोलप, नगरसेवक सलीम शेख यांच्या आई जैबुन्नीसा शेख यांच्याबरोबरच अभिनेत्री स्मिता तळवलकर, संगीत अभ्यासक मोहन नाडकर्णी, तसेच माळीण दुर्घटनेतील मृत ग्रामस्थ, मलेशिया विमान दुर्घटनेत ठार झालेले प्रवासी अशा सर्व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून महासभा तहकूब करण्याची सूचना जवळपास सर्वच पक्षांनी केली.
विशेष म्हणजे, नगरसेवक डॉ. घोलप यांनी आपल्या वडिलांच्या निधनामुळे महासभा तहकूब करू नये तर सभेतच विकासकामांना मंजुरी देणे हीच आपल्या वडिलांना श्रद्धांजली ठरेल, असे पत्र दिले असतानाही मनसेनेच सभा तहकुबीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर दिवगंतांना मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली आणि त्यानंतर लगेचच कॉँग्रेस गटनेतेपदी कांबळे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे बाके वाजवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यानंतर शोकमग्न होऊन पुन्हा महासभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे शोकसभेतच या नियुक्तीची घोषणा करणे इतके महत्त्वाचे होते काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापौरांनी बुधवार, दि. १३ रोजी महासभा बोलावली असून, दोन दिवसांनीदेखील ही नियुक्ती होऊ शकली असती. (प्रतिनिधी)

Web Title: First mourning, then applause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.