Sinnar Crime: तालुक्यातील रामपूर (पवारवाडी) येथील ४१ वर्षीय युवकाचा डोक्यात वार व मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील शहा-पंचाळे रस्त्यावर पंचाळे शिवारात शाळेजवळ सदर युवकाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात पळवून नेऊन मारहाण करून खून केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. रवींद्र बबन जाधव (४१) रा. रामपूर (पवारवाडी) ता. सिन्नर असे मृताचे नाव आहे.
जाधव शनिवारपासून बेपत्ता होते. जाधव घरी न परतल्याने नातेवाइकांकडून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास जाधव हे पंचाळे शिवारातील गडाख पब्लिक स्कूलजवळ बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. नातेवाइकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मयत रवींद्र जाधव यांच्या डोक्यात वार केल्याचे व मारहाण झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. त्यानंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सीताराम गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीहून अज्ञात मारेकऱ्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. जाधव यांना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेऊन मारहाण करीत त्यांना ठार मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी दुपारी जिल्हा पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलिस उपअधीक्षक नीलेश पालवे, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, उपनिरीक्षक किशोर पाटील यांच्यासह एमआयडीसी पथकाने घटनास्थळी पाहणी केली.