शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पळवापळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 00:05 IST2018-06-17T00:05:07+5:302018-06-17T00:05:07+5:30
आनंदवली येथील मनपा शाळा क्र. १८ मधून शाळेच्याच शेजारी असलेल्या खासगी शाळेत विद्यार्थी बळजबरीने दाखल करण्याचा प्रकार शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि राष्टÑसेवा दलाचे कार्यकर्ते शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व शाळेची पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची पळवापळवी
नाशिक : आनंदवली येथील मनपा शाळा क्र. १८ मधून शाळेच्याच शेजारी असलेल्या खासगी शाळेत विद्यार्थी बळजबरीने दाखल करण्याचा प्रकार शाळेच्या पहिल्याच दिवशी घडला. शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच आणि राष्टÑसेवा दलाचे कार्यकर्ते शाळेचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व शाळेची पाहणी करण्यासाठी तेथे गेले असता त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. या शाळेतील शिक्षकांनी मनपाच्या शाळेत दाखल होण्यासाठी आलेले विद्यार्थी बळजबरी आपल्या शाळेत दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला. नूतन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, खासगी आणि शासकीय सगळ्याच शाळांना विद्यार्थ्यांची गरज आहे. मात्र ज्या शाळेकडे स्वत:चे मैदान नाही, स्वमालकीची इमारत नाही, ज्या विविध प्रकारे फी आकारून सर्व विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करतात, अशा शाळांनी मनपाच्या शाळांचे विद्यार्थी पळविणे योग्य नसल्याची भावना येथील पालकांनी व्यक्त केली. या शाळेने काही दिवसांपूर्वी परिसरातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शालेय गणवेशांचे वाटप केले. आनंदवली परिसरातील शाळा नं.३३, शाळा नं.७१ व शाळा नं. ९ या तीन शाळा नं.१८ मध्ये विलीन करण्यात आल्या. याच शाळेतून विद्यार्थी ओढून नेण्याचा प्रकार झाला. मनपा शाळांना कुणी वाली नाही का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
मनपा शाळा टिकल्या पाहिजेत, या शाळांमधून विद्यार्थी घडले पाहिजे हा शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचचा उद्देश आहे. त्यासाठी नियमित शाळांना भेटी देणे, शाळांच्या अडचणी जाणून घेणे यावर भर दिला जातो. शुक्रवारी (दि.१५) घडलेला प्रकार चुकीचा आहे. मनपा शिक्षण विभागाने, आयुक्तांनी यात लक्ष घालावे. - वसंत एकबोटे, सामाजिक कार्यकर्ते