राजीव गांधी भवनातील ती आग शॉटसर्किटनेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:41 IST2021-02-05T05:41:58+5:302021-02-05T05:41:58+5:30
गेल्या शुक्रवारी (दि.२२) महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर विराेधी पक्षनेता आणि गटनेत्यांच्या केबिनला अचानक आग लागली होती. या कक्षांमध्ये कोरोनामुळे पेस्ट ...

राजीव गांधी भवनातील ती आग शॉटसर्किटनेच!
गेल्या शुक्रवारी (दि.२२) महापालिकेच्या पहिल्या मजल्यावर विराेधी पक्षनेता आणि गटनेत्यांच्या केबिनला अचानक आग लागली होती. या कक्षांमध्ये कोरोनामुळे पेस्ट कंट्रोल करायचे असल्याने ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या नगर सचिव विभागाच्या कर्मचाऱ्यांना तीन तास बाहेर थांबण्यास सांगितले. त्यामुळे स्टोअर रूम म्हणून असलेल्या कक्षाच्या दालनात पेस्ट कंट्रोलसाठी काम करण्यापूर्वी व्हॅक्युम क्लीनर लावतानाच स्वीच बोर्डात ठिणग्या उडाल्या आणि त्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत होते. महापालिकेत कार्यालयीन कामाच्या वेळी नेहमीच वर्दळ असते. मात्र, त्या दिवशी पेस्ट कंट्रोलचे काम असल्याने कर्मचारी बाहेर हेाते तर गटनेते आणि अन्य नगरसेवक हजर नव्हते. दरम्यान, आग सॅनिटायझरमुळे लागली की शॉटसर्किटमुळे अथवा पेस्ट कंट्रोलमुळे असे अनेक प्रकारच्या शंका व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे आयुक्त कैलास जाधव यांनी तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती.
शहर अभियंता संजय घुगे, अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाण, अग्निशमन दलाचे प्रमुख संजय बैरागी यांचा चौकशी समितीत त्यांचा समावेश होता. या समितीने प्राथमिक चौकशी नंतर पेस्ट कंट्रोल कर्मचाऱ्यांचे प्रत्यक्षदर्शी जबाब नोंदवले आणि त्यानंतर शुक्रवारी (दि.२९) अहवाल सादर केला आहे. त्यानुसार शॉटसर्किटनेच आग लागल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. तर दुसरीकडे महापालिकेच्या इमारतीचे फायर ऑडिट आणि इलेक्ट्रिक ऑडिट करावे, तसेच पार्टिशन हे फायर प्रूफ असावे अशा प्रकाराच्या शिफारसीदेखील करण्यात आल्या आहेत.