राहुल ट्रेडर्स मॉलमध्ये आगीचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST2021-08-20T04:19:59+5:302021-08-20T04:19:59+5:30

शहरातील एमजीरोडवरील रेडक्रॉस सिग्नलकडून धुमाळ पॉइंट-दहीपुलाकडे जाणारा रस्ता मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे. हा परिसर दिवसभर गजबजलेला असतो. संध्याकाळी ५ ...

Fire erupts at Rahul Traders Mall | राहुल ट्रेडर्स मॉलमध्ये आगीचे तांडव

राहुल ट्रेडर्स मॉलमध्ये आगीचे तांडव

शहरातील एमजीरोडवरील रेडक्रॉस सिग्नलकडून धुमाळ पॉइंट-दहीपुलाकडे जाणारा रस्ता मुख्य बाजारपेठेचा रस्ता आहे. हा परिसर दिवसभर गजबजलेला असतो. संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक राहुळ ट्रेडर्सच्या तळमजल्यातून धुराचे लोट उठल्याने दुकानातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. घटनेची माहिती ५ वाजून ६ मिनिटाला अग्निशमन दलाच्या मुख्यालयात सीमा भंडारी यांनी कळविली. माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथून पहिल्या बंबासह जवानांनी धाव घेतली. आगीचे स्वरूप मोठे आणि मुख्य स्रोत तळमजला असल्याने अतिरिक्त मदत म्हणून पंचवटी उपकेंद्रावरून दोन बंबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या तीन बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र आग आटोक्यात येत नव्हती. दोन्ही बंबांमधील पाणी संपल्याने हे बंब पुन्हा भरणा करण्यासाठी रवाना झाले. तोपर्यंत मुख्यालयातील तीन आणि सिडको, सातपूर, कोणार्कनगर केंद्रावरून प्रत्येकी एक असे सहा बंब एकापाठोपाठ घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले. दरम्यान, हा संपूर्ण परिसर धुरात हरविला होता. संततधार पाऊस, बघ्यांची गर्दी, स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यालगत केलेले खाेदकाम असे एक ना अनेक अडथळ्यांवर मात करत आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविताना यंत्रणेची दमछाक झाली. रात्री ८ वाजताच्या सुमारास आग शमली अन् सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

---इन्फो---

बाजारपेठेत धावपळ अन् गोंधळ

रेडक्रॉस चौकाच्या परिसरात संध्याकाळी लागलेल्या या आगीच्या घटनेने बाजारपेठेत एकच धावपळ उडाली. मेन रोड, दहीपूल, शालीमार या भागातील नागरिक या परिसरात जमा झाल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. तसेच वाहतूक कोंडीही निर्माण झाली होती. हा संपूर्ण परिसर बाजारपेठांचा आहे. यामुळे गर्दी प्रचंड झाली होती. सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अखेर ॲक्शन मोडमध्ये येत बघ्यांची गर्दी पांगविली.

--इन्फो--

मॉलमध्ये आठ ते दहा कर्मचारी

आगीची घटना घडली तेव्हा मॉलमध्ये आठ ते दहा कर्मचारी होते. तळमजल्यातून धूर येऊ लागल्याचे वेळीच लक्षात आल्याने सर्वांनी सुरक्षितरित्या बाहेर धाव घेतली. अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोहोचले अन् आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात झाली; मात्र अचानक आगीने रौद्रावतार घेतला.

---इन्फो--

वाहतूक पोलिसांचे उशिराने आगमन

बाजारपेठेच्या मुख्य परिसरात आगीची मोठी दुर्घटना घडल्याबाबतचा ‘कॉल’ नियंत्रण कक्षातून धाडकला जाऊनसुद्धा शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी सुमारे तासाभराने पोहोचले. तोपर्यंत एम.जी. रोड, रेडक्रॉस सिग्नल ते रविवार कारंजा आणि नेहरू गार्डन ते सिग्नलपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे अग्निशमन दलाच्या बंबांनाही घटनास्थळी पोहोचताना तारेवरची कसरत करत वाहतूक कोंडीतून वाट शोधावी लागली.

--कोट--

पाच वाजताच्या सुमारास आगीची घटना घडली. धूर येताच सगळे कर्मचारी मॉलमधून बाहेर पडले. सुमारे दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविले गेले; मात्र तोपर्यंत लाखो रुपयांची हानी झाली होती. आगीचे नेमके कारण लक्षात आले नाही; मात्र तळमजल्यातून प्रारंभी धूर येऊ लागला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी खूप मेहनत घेतली.

- राहुल सुरेश भंडारी, दुकानमालक

Web Title: Fire erupts at Rahul Traders Mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.