पीक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:40 IST2020-12-11T04:40:12+5:302020-12-11T04:40:12+5:30
खरेदी केंद्राचे व्यवस्थापन मालेगाव शेतकरी सहकारी संघाकडे असून, शासनाच्या निळगव्हाण केंद्रावर मका, बाजरी व ज्वारीची खरेदी केली जाते. ...

पीक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट
खरेदी केंद्राचे व्यवस्थापन मालेगाव शेतकरी सहकारी संघाकडे असून, शासनाच्या निळगव्हाण केंद्रावर मका, बाजरी व ज्वारीची खरेदी केली जाते. बारदानाची खरेदी व एका पोत्यामागे दहा रुपये हमालीची रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी लागते. ५० किलोच्या बारदानाची किंमत २५ ते २८ रुपये आहे. प्रत्यक्षात पन्नास किलोच्या एका बारदानाच्या पोत्यात ५१ किलो ५०० ग्रॅम शेतमाल मोजला जातो. ५० ग्रॅम पोत्याचे वजन गृहित धरले जाते. एक किलाे शेतमाल जादा घेतला जातो. पोत्यामागे दहा रुपये हमाली घेतली जाते. पोत्यामागे ३५ रुपये आथिर्क भुर्दंड शेतकऱ्यांना साेसावा लागत आहे. शंभर क्विंटल मका, ज्वारी व बाजरी खरेदी व्यवहारात दोन क्विंटल जादा माल घेतला जातो. प्रत्येक पोत्याची मोजणी भूईकाट्याने केली जाते. शेतकऱ्यांना बारदाना व हमालीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. खरेदी केंद्रावर शेतकरी संघाचा अपुरा कर्मचारी वर्ग व हमालांची संख्यादेखील कमी असल्याने शेतकऱ्यांना दोन ते तीन दिवस खरेदी केंद्रावर मुक्काम ठोकावा लागत आहे. खरेदी केंद्राची कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. विजेची सोय नसल्याने मालाची खरेदी बंद करावी लागत आहे.
इन्फो
सुविधांचा अभाव
शेतकऱ्यांसाठी खरेदी केंद्रावर पिण्याच्या पाण्याची तसेच नैसर्गिक विधीसाठी कोणतीही सुविधा नसल्याने गैरसोय होत आहे. शासनाने बारदाना पुरवठा न केल्याने शेतकऱ्यांना बारदाना खरेदी करून व हमालीची रक्कम देऊन मालाची विक्री करावी लागत आहे. शासनाची ही कार्यपद्धती शेतकऱ्यांची लूट करणारी असल्याने मनस्ताप होत आहे. पन्नास किलोच्या पोत्यामागे दीड किलो शेतमाल जादा घेणे अन्यायकारक आहे. कृषी मंत्री दादा भुसे यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.