माजी सभापती चुंभळे यांच्या कारकिर्दीत आर्थिक गैरव्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:05 IST2021-07-13T04:05:40+5:302021-07-13T04:05:40+5:30
दोन दिवसांपूर्वी चुंभळे यांनी जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या पथकास बाजार समिती माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देणे गरजेचे असताना ...

माजी सभापती चुंभळे यांच्या कारकिर्दीत आर्थिक गैरव्यवहार
दोन दिवसांपूर्वी चुंभळे यांनी जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या पथकास बाजार समिती माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून देणे गरजेचे असताना सभापतींच्या आदेशान्वये मज्जाव केल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. सदर आरोप संचालक मंडळाने फेटाळून लावत जिल्हा उपनिबंधकांनी नियुक्त केलेल्या पथकाला माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून दिली नसती तर बाजार समिती संचालकांना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री कायद्यान्वये नोटीस कशी बजावली, असा प्रतिसवाल केला आहे.
चुंभळे यांनी फर्निचरसाठी सभेची मंजुरी नसताना त्यांच्या अधिकारात खरेदी केली. त्यासाठी निविदा काढल्या नाहीत. मनपाकडून पूर्वमंजुरीविना बाजार समितीने सेल हॉल संकुल बांधकाम केले. ई-नाम योजना राबविण्यासाठी शरदचंद्र पवार, पंचवटी बाजार समितीत शेतमालाची नोंद घेण्यासाठी प्रवेशद्वार, गेट कॅबिन बांधकाम करण्यासाठी ४९ लाख ९९ हजार रुपये खर्च केला. प्रत्यक्षात त्या कामासाठी लाख रुपयेदेखील खर्च आला नाही. बाजार समितीच्या कामांना विरोध केला तर चुंभळे शिवीगाळ करून धमकी देत असल्याचा आरोप संचालकांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी विश्वास नागरे, दिलीप थेटे, चंद्रकांत निकम, संजय तुंगार, तुकाराम पेखळे आदी उपस्थित होते.
इन्फो
चुंभळेंकडून खुर्ची खरेदीत घोटाळा
माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी संचालकांना बसण्यासाठी खरेदी केलेल्या खुर्ची खरेदीत मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. चुंभळे यांनी प्रति खुर्ची आठ हजार रुपये दराने तब्बल २० खुर्च्या खरेदी केल्या. मात्र काही दिवसांत खुर्च्यांना गंज लागला आहे. शिवाय काही खुर्च्या तुटल्या आहेत. ज्या खुर्च्यांना हजारो रुपये लागले पाहिजे होते तेथे चुंभळेंच्या अट्टाहासापायी लाखो रुपये खर्च झाला. याशिवाय सर्वसाधारण सभेसाठी प्लॅस्टिक खुर्च्या खरेदी केल्या असून, त्या धूळ खात पडून आहेत.
- देवीदास पिंगळे, सभापती बाजार समिती