खासगी वाहनधारकांना आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 00:33 IST2020-07-27T22:11:35+5:302020-07-28T00:33:33+5:30
मालेगाव : तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने ठाण मांडल्याने शहरातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. त्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसह वाहनचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

खासगी वाहनधारकांना आर्थिक फटका
मालेगाव : तालुक्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोनाने ठाण मांडल्याने शहरातील अनेक उद्योगांना फटका बसला आहे. त्यात खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांसह वाहनचालकांवरही उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे खासगी प्रवासी वाहतूक सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
टॅक्सी सेवा बंद असल्याने पाचशेहून अधिक वाहनचालक बेरोजगार झाले आहेत. वाहतूक कधी पूर्ववत सुरू होते याकडे लक्ष लागले आहे. मालेगाव शहरात सुरुवातीस कोरोनाने हाहाकार केला होता. त्यामुळे शहर दहशतीखाली होते. सर्व शहर ठप्प झाले तर उद्योगधंद्यांना टाळे लागले होते. सध्या शहराची स्थिती सामान्य होत आहे. कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. काही व्यापारी प्रतिष्ठाने, उद्योगधंद्यांनी उभारी घेतली आहे; पण प्रवासी बस वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठी झळ बसत आहे. सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा मालेगावहून मुंबई, पुणे, नाशिक, गुजरात तसेच अन्य ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहन भाडेतत्त्वावर घ्यावे लागत आहे. त्यामुळे प्रवासखर्च दहापटीने वाढला आहे. ट्रॅव्हल्स कंपन्या फिजिकल डिस्टन्स व लॉकडाऊनच्या नियमानुसार तीन ते चार प्रवाशांची वाहतूक करत आहेत. मात्र टॅक्सी व तत्सम वाहनातून प्रवासी वाहतूक बंद असल्याने या व्यवसायिकांवर संक्रांत आली आहे. प्रवासी वाहतूक बंदमुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. त्यामुळे सर्व व्यवसायिक हतबल झाले असून, सर्व व्यवहार पूर्ववत होण्याची प्रतीक्षा करत आहेत.
-----------------------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी वाहतूक बंद आहे. शेकडो टॅक्सी नाशिकसह अन्य ठिकाणावर जात नाही. त्यामुळे मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. कमी प्रवासी वाहतूक परवडत नाही. त्यामुळे मालक-चालक यांच्यावर संक्रांत आली आहे. यावर काही मार्ग निघावा.
- सुनील चांगरे, शहरप्रमुख
टॅक्सी चालक-मालक संघटना, मालेगाव