अखेर ‘सेतू’साठी निविदा
By Admin | Updated: January 3, 2015 01:39 IST2015-01-03T01:37:10+5:302015-01-03T01:39:50+5:30
अखेर ‘सेतू’साठी निविदा

अखेर ‘सेतू’साठी निविदा
नाशिक : अनियमित कामकाज व वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर अखेर नाशिक शहर व तालुक्यासाठी असलेला सेतू ठेकेदार बदलण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. दरम्यान, सर्व शासकीय दाखले एकाच प्रकारच्या नमुन्यातून दिले जावेत यासाठी सेतू व महा-ई-सेवा केंद्रचालकांना ‘महा आॅनलाइन’ पोर्टलचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वर्षभरापूर्वीच सेतू ठेकेदाराची मुदत संपुष्टात आली असली तरी, लागोपाठच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या कामात प्रशासकीय यंत्रणा अडकून पडल्यामुळे ठेकेदारालाच मुदतवाढ देण्यात आली. याचदरम्यान महा-ई-सेवा केंद्रे सुरू झाल्यामुळे सेतूला पर्यायी यंत्रणा उभी राहिल्याने सेतू ठेकेदार काहीसा नाराज झाला. त्यातून त्याच्या कामकाजावर परिणाम होऊन अनियमितता व गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने जिल्हा प्रशासनाने ५० हजार रुपयांची दंडात्मक कारवाईही केली होती. धान्य वितरण अधिकाऱ्यांनीही सेतू केंद्रातून शिधापत्रिकेचे अर्ज गहाळ झाल्याची तक्रार केल्यामुळे सेतू ठेकेदार बदलाची कार्यवाही सुरू झाली. त्यानुसार ३१ डिसेंबर रोजी सेतू केंद्र चालविण्याविषयी ‘आॅनलाइन’ निविदा काढण्यात आल्या असून, १३ जानेवारीपर्यंत निविदा स्वीकारल्या जातील.