नाशिक : मागील काही दिवसांपासून सोशल मिडियाच्या माध्यमातून पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदलीची चर्चा सुरू होती. त्यांच्या रिक्त पदावर कोल्हापुरचे विशेष महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात होते. सोमवारी (दि.२५) या दोन्ही चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब झाले. गृह विभागाकडून भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील.
गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे आव्हानआगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाºयांच्या बदल्या गृह विभागाकडून करण्यात आल्या आहेत. नाशिक पोलीस आयुक्तालयाचा कारभाराची सुत्रे विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी निश्चितच वाढली आहे. कारण नाशिक शहरात या सव्वा ते दीड महिन्यात खूनाच्या तब्बल सात घटना घडल्या आहेत. यासोबतच घरफोडी, हाणामारी, लूटमार, दुचाकी, चारचाकी चोरींसारखे गुन्हे नित्यनेमाने सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडत आहेत. यामुळे नाशिककरांमध्ये उलटसुलट चर्चाही सुरू आहे. वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नांगरे-पाटील यांच्यापुढे उभे राहिले आहे. त्यांनी लातूर, अहमदनगर, पुणे, मुंबई, ठाणे या शहरांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्याकडे असलेला अनुभव आणि बेधडक काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची पोलीस दलात ओळख आहे. नाशिकमध्ये त्यांना प्रथमच सेवा बजावण्याची संधी मिळाली असून येथील गुन्हेगारांवर ते कशाप्रकारे खाकीचा वचक निर्माण करतात ते येणा-या काळात दिसून येईल. कोल्हापुरमध्ये नांगरे पाटील यांनी गुन्हेगारांच्या सुमारे १०० टोळ्यांवर मोक्का लावला होता तर पावणे सातशे गुन्हेगारांना गजाआड करण्याची धडाकेबाज कारवाई करुन कोल्हापूरवासीयांना दिलासा दिला होता, अशाच कारवाईची अपेक्षा नाशिककरांना त्यांच्याकडून असणार आहे. गुंडगिरीविरोधात त्यांनी कोल्हापूरमध्ये ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतीचा अवलंब करत गुंडांना धडा शिकविण्याचे आदेश पोलीस दलाला एका अल्पवयीन मुलीच्या हत्त्येनंतर दिले होते. त्यावेळी त्यांनी राजकीय दबावाला बळी न पडता ‘सर्वांचा दबाव झुगारून कामाला लागा’ असे ठणकावून सांगितले होते. सर्व प्रकारच्या तक्रारींचा सामना करण्यास किंवा संबंधितांना तोंड देण्यास मी सक्षम आहे, असेही नांगरे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले होते.त्यांच्या धडाकेबाज पोलीस सेवा कार्याविषयी संपुर्ण महाराष्टÑाला ओळख आहे. नाशिककरांनाही त्यांच्याकडून कायदासुव्यवस्थेचे असेच चोख संरक्षणाची अपेक्षा आहे. शहर व परिसरात वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणून पोलीस दलाला आलेली मरगळ झटकून टाकण्याचे आव्हान नांगरे-पाटील यांच्यापुढे राहणार आहे.