...अखेर ‘हायड्रो’च्या जंगलात पिंजरा तैनात : भीतीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 22:30 IST2017-09-10T22:26:20+5:302017-09-10T22:30:10+5:30
नाशिक पश्चिम वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने पुन्हा मेरीचे हायड्रो गाठले. संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबट्याचा अधिवासामधील पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. दिवसभर रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हायड्रोच्या परिसरात दुपारी पिंजरा लावला.

...अखेर ‘हायड्रो’च्या जंगलात पिंजरा तैनात : भीतीचे सावट
पंचवटी : हिरावाडी पाटाच्या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू झाली होती; मात्र चर्चेनुसार पुरावे उपलब्ध होत नव्हते, बिबट्याचे वास्तव्य नव्हे तर वावरही असल्याचे पुरावे वनविभागाकडून शोधले जात होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी हिरावाडीतून वज्रेश्वरीनगरकडे जाणाºया रस्त्यावर ‘मेरी हायड्रो’च्या संरक्षक भिंतीवर बिबट्याचा ठिय्या नागरिकांनी बघितला. बिबट्याची ही रुबाबदार बैठक सोशल मीडियावरून व्हायरल झाली. सदर बाब लक्षात घेऊन छायाचित्रांची ओळख पटल्यानंतर खात्री करून वनविभागाच्या कर्मचाºयांनी हायड्रोच्या जंगलात ‘त्या’ भिंतीपासून शंभर मीटरच्या अंतरावर रविवारी (दि.१०) पिंजरा तैनात केला आहे.
रविवारी सकाळी नाशिक पश्चिम वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने पुन्हा मेरीचे हायड्रो गाठले. संपूर्ण परिसर पिंजून काढत बिबट्याचा अधिवासामधील पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. दिवसभर रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी हायड्रोच्या परिसरात दुपारी पिंजरा लावला. तसेच नागरिकांनी रात्रीच्या वेळी या रस्त्याने वापर करू नये, असे आवाहन केले आहे. वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील, प्रभाकर खैरनार, गोविंद पंढरे, विजय पाटील, जयनाथ गोनटे आदिंनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने हिरावाडीतून वज्रेश्वरीनगरकडे जाणाºया पाट रस्त्यावर आता काहीसा शुकशुकाट पसरल्याचे चित्र रविवारी पहावयास मिळत होते. बिबट्याच्या धाकाने रात्रीच्या वेळी पाट रस्त्याने ये-जा करणे नागरिकांनी बंद केले आहे, तर पाटकिनारी लागून असलेल्या वज्रेश्वरीनगर परिसरातही भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी पाटकिनारी तसेच पाटाजवळ असलेल्या पुलावर थांबणारे मद्यपींचे टोळके हे बिबट्याच्या धाकाने धास्तावले आहेत. परिसरात बिबट्याचा संचार असल्याने रविवारी वनविभागाने पिंजरा लावला असून, सकाळी प्रभाग समिती सभापती प्रियंका माने, नगरसेवक जगदीश पाटील, धनंजय माने आदिंनी वनविभागाच्या पथकाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत त्यांना आवश्यक ते सहकार्य केले.