अखेर निवृत्तीनाथ महाराज संस्थानवर प्रशासक समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:37 IST2021-02-05T05:37:09+5:302021-02-05T05:37:09+5:30
संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या विश्वस्तपदासाठी तब्बल १८७ अर्ज आल्याने गेल्या महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. १२ जानेवारीपर्यंत त्यासाठी ...

अखेर निवृत्तीनाथ महाराज संस्थानवर प्रशासक समिती
संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या विश्वस्तपदासाठी तब्बल १८७ अर्ज आल्याने गेल्या महिन्यात मुलाखती घेण्यात आल्या. १२ जानेवारीपर्यंत त्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी इच्छुकांमध्ये जोरदार स्पर्धा देखील झाली. अनेकांनी वेगवेगळ्या मार्गाने वर्णी लागण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सर्वसाधारणपणे मुलाखतींचे कामकाज पूर्ण होताच तत्काळ दुसऱ्या दिवशी निवडलेल्या विश्वस्तांची यादी प्रसिद्ध होत असते. मात्र, यंदा मुलाखती झाल्यानंतर देखील अनेक दिवस उलटून गेल्यानंतर देखील नावे घोषित न झाल्याने अनेकांनी शंका व्यक्त केली होती. आता धर्मादाय सहआयुक्तांनी नव्याने अर्ज मागवल्याने अगोदरची निवड प्रक्रिया रद्द झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
धर्मादाय सह आयुक्त जयसिंग झपाटे यांनी जाहीर प्रकटनाव्दारे २५ फेब्रुवारीपर्यंत नव्याने इच्छुकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. परंतु तोपर्यंत संंस्थानच्या देखभालीसाठी प्रशासक समिती नियुक्त केली असून त्यात सहायक धर्मादाय आयुक्त के. एन. सोनवणे, ॲड. भाऊसाहेब गंभीरे, त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांचा समावेश केला आहे.
दरम्यान, पारदर्शकपणे राबविण्यात आलेली विश्वस्तपदाची मुलाखत प्रक्रिया कोणतेही कारण न देता का रद्द करण्यात आली असा प्रश्न करून वारकरी सेवा समितीने नव्याने अर्ज न मागवता अगोदरची प्रक्रियाच पुढे न्यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्यात येईल असे वारकरी सेवा समितीचे अध्यक्ष अमर ठाेंबरे, बाळासाहेब काकड, राजेंद्र भांड, लहानू पाटील पेखळे, श्रावण महाराज अहिरे, दत्तू पाटील आदींनी केली आहे.
इन्फेा...
दबाव आणल्यास इच्छुक अपात्र
विश्वस्तपदासाठी इच्छुक अर्जदाराने राजकीय अथवा कोणत्याही प्रकारची शिफारस अथवा दबाव आणू नये, तसे केल्यास संबंधित अर्जदार विश्वस्तपदासाठी अपात्र ठरवण्यात येईल असे नव्याने अर्ज मागवताना धर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे.