तीन पोती भरुन चंदनाची लाकडे हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST2021-02-05T05:38:19+5:302021-02-05T05:38:19+5:30
इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चंदन झाडाच्या चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास केला जात होता. गुन्हे शाखेच्या युनिट-२ ...

तीन पोती भरुन चंदनाची लाकडे हस्तगत
इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या चंदन झाडाच्या चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा समांतर तपास केला जात होता. गुन्हे शाखेच्या युनिट-२ चे सहायक उपनिरीक्षक शामराव भोसले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने बंगाली बाबा थांब्याजवळ सापळा रचला. यावेळी संशयित चंदनचोर विजय लक्ष्मण मुर्गे (वय ५५) , भागचंद राधाकिसन तांदळे (३९, दोघे रा. नेवासा, जि.अहमदनगर) हे संशयास्पद स्विफ्ट मोटारीने (क्र.एम.एच१७ अेजे ४८२२) नाशिककडे येत असताना दिसले. पथकाने मोटार थांबवून या दोघा संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या संशयितांनी उपनगर पोलीस ठाणेहद्दीत दोन ठिकाणी तर इंदिरानगरमध्ये एका ठिकाणी चंदनाच्या वृक्षांना ‘चुना’ लावल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातील वाहनाची कसून चौकशी केली असता त्यामध्ये तीन गोण्या भरुन या गुन्ह्यांत कापलेल्या चंदनवृक्षांची लाकडे मिळून आली. पोलिसांनी चंदनाची लाकडे व गुन्ह्यात वापरलेली मोटार जप्त केली आहे.