परीक्षा फॉर्म भरला गणिताचा, गुण मिळाले जीवशास्त्राचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:16+5:302021-09-18T04:16:16+5:30
नाशिक : नाशिकरोडच्या केला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना शाळेच्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची घटना ताजी असतानाच ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयातील ...

परीक्षा फॉर्म भरला गणिताचा, गुण मिळाले जीवशास्त्राचे
नाशिक : नाशिकरोडच्या केला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना शाळेच्या चुकीमुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची घटना ताजी असतानाच ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयातील एका शिक्षकाच्या चुकीमुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे. बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने २०२१ साठी परीक्षा अर्जात गणित विषय नमूद केला. मात्र, निकालानंतर गणिताऐवजी जीवशास्त्र विषयाचे गुण मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आता निकालपत्रातील चूक बदलण्यासाठी त्या विद्यार्थिनीसह तिच्या पालकांवर विभागीय शिक्षण मंडळ, तसेच महाविद्यालयात खेट्या घालण्याची वेळ आली आहे.
देशातील कोरोना संसर्ग दुसरी लाट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने दहावी, बारावी वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना मागील शैक्षणिक वर्षाच्या गुणांकनानुसार उत्तीर्ण केले होते. जुलै महिन्यात बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. पंचवटीतील तारवालानगरला राहणाऱ्या स्नेहल भूषण देशमुख या विद्यार्थिनीने ब्रह्मा व्हॅलीत बारावी विज्ञान शाखेला प्रवेश घेतला होता. परीक्षा अर्ज भरताना इंग्रजी, हिंदी, भूगोल, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित नमूद केले होते. यंदा परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे गुणांकनानुसार निकाल घोषित झाला. देशमुखला ८२ टक्के गुण मिळाले. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र, निकालपत्र हाती मिळताच, तिचा भ्रमनिरास झाला. निकालपत्रात गणिताऐवजी जीवशास्त्राचे गुण मिळाल्याचे पाहून तिला धक्का बसला. निकालपत्रातील चुकीबाबत देशमुखने महाविद्यालयात धाव घेतली असता निकालपत्राची प्रत आल्यावर बदल होईल असे सांगितले. त्यानंतर आठवडाभराने निकालपत्र मिळताच महाविद्यालयात दुरुस्ती कामासाठी संपर्क केला. त्यावर सदर
महाविद्यालयाने चूक दुरुस्तीसाठी प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे पाठविला. तेथे संपर्क साधला असता, शिक्षण मंडळाने आमची काही चूक नसल्याचे सांगून हात वर केले. महाविद्यालयात गेल्यावर महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या शिक्षकाकडून चुकीच्या विषयाचे गुण दिले अशी कबुली देत शिक्षण मंडळाला माफीनामा लिहून देत चूक दुरुस्तीसाठी पत्र दिले. मात्र, सव्वामहिना होऊनही शिक्षण मंडळ लक्ष घालत नाही. परिणामी विद्यार्थिनीची मानसिक स्थिती ढासळली आहे. शिक्षण विभाग व महाविद्यालय प्रशासन दखल घेत नसल्याने काही दिवसांपूर्वी विद्यार्थिनीने राज्यमंत्री बच्चू कडू यांना निकालपत्रातील चूक दुरुस्त करावी, अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.
इन्फो====
सीईटी परीक्षा कशी देणार?
मला आगामी शिक्षण अभियांत्रिकीला घ्यायचे आहे. गणित विषयाचा अभ्यास करून गणिताचा अर्ज भरला, तर सीईटी परीक्षेसाठी गणिताचे नोटबुक महाविद्यालयात जमा केले आहे. असे असताना जीवशास्त्र विषयाचे गुण कसे काय मिळाले, यात माझी काही चूक नाही त्यामुळे माझे भविष्य व भावी आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता असल्याने मी निराश झाले आहे.
-स्नेहल देशमुख, विद्यार्थिनी