पतंग उडविणा-याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:34 IST2018-12-15T17:33:59+5:302018-12-15T17:34:14+5:30
सिन्नर : नायलॉन मांजामुळे युवक जखमी

पतंग उडविणा-याविरुद्ध गुन्हा दाखल
सिन्नर : नायलॉन मांजा वापरुन पतंग उडवून युवकाच्या गळ्यास गंभीर दुखापत केल्याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात पतंग उडविणा-या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरावी.
नाशिक-पुणे महामार्गावर गुरुवारी (दि.१३) सकाळी नायलॉन मांजा गळ्यात अडकून उमाकांत मधुकर नवले (३२) हा युवक गंभीर जखमी झाला होता. नायलॉन मांजाने गळ्याची रक्तवाहिनी व स्नायू तुटल्याने त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली होती. सुदैवाने श्वासनलिकेला इजा न झाल्याने मोठा अनर्थ टळला होता. त्यानंतर नगरपरिषदेच्या पथकाने शहरात मोहीम राबवून पतंग व मांजा विक्रेत्यांविरोधात मोहीम उघडली. मात्र त्यात त्यांना मांजा आढळून आला नव्हता.
दरम्यान, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी जखमी उमाकांत नवले या तरुणचा जबाब नोंदवून घेत अज्ञात पतंग उडविणा-याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ, राहुल निरगुडे अधिक तपास करीत आहेत.