पंधरा हजार नेत्ररुग्णांची तपासणी
By Admin | Updated: January 2, 2017 01:12 IST2017-01-02T01:12:32+5:302017-01-02T01:12:47+5:30
तात्याराव लहाने : जिल्हा रुग्णालयात होणार पाचशे शस्त्रक्रिया

पंधरा हजार नेत्ररुग्णांची तपासणी
नाशिक : मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने व डॉ. रागिणी पारिख यांच्या पथकाने दिवसभरात सुमारे १५ हजारपेक्षा अधिक नेत्ररुग्णांची तपासणी केली. यातील सुमारे दीड हजार रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला असून, सुमारे पाचशे शस्त्रक्रिया याच महिन्यातील चार दिवस निवडून नाशिक जिल्हा रुग्णालयात क रण्यात येणार असल्याची माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
मुंबईच्या जवळ असूनही नाशिक जिल्ह्यात नेत्ररुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगत डॉ. लहाने यांनी चिंता व्यक्त केली. महाआरोग्य शिबिरादरम्यान नेत्रदोष असणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले असून, हे चिंताजनक असल्याने अशा रुग्णांना वेळीच उपचार मिळणे गरजेचे आहे.
या शिबिरामध्ये अनेक रग्णांची तपासणी झाली असली तरी हे प्रमाण आटोक्यात आणण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच एका डोळ्याला मार लागल्याने नेत्रदोष असलेल्या रुग्णांचे प्रमाणही अधिक असल्याचे ते म्हणाले. डोळ्याला मार लागल्यास तत्काळ नेत्रतज्ज्ञांक डून उपचार करून घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अनुवंशिकतेने येणारा डोळ्यातील तिरळेपणा, मोतीबिंदूच्या समस्याही मोठ्या प्रमाणात असून, अशा विविध प्रकारच्या नेत्ररुग्णांपैकी सुमारे दीड हजार रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात आला असून, पाच हजार चष्म्यांचे नंबर सुचविल्याचे लहाने यांनी सांगितले. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया सुचविलेल्या रुग्णांपैकी शक्य असलेल्या ५०० रुग्णांची निवड करून त्यांची येथील जिल्हा रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्याचा विचार असल्याचे लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)