व्यावसायिकही साधणार पर्वणी
By Admin | Updated: July 22, 2015 01:34 IST2015-07-22T01:34:39+5:302015-07-22T01:34:50+5:30
सिंहस्थ स्टॉक : बाजारपेठांमध्ये लागले आतापासूनच ‘सेल’

व्यावसायिकही साधणार पर्वणी
नाशिक : पावसाळ्याचे दिवस, त्यातच लग्नसराईचाही मोसम नाही, अशा मंदीच्या काळात शहरातील व्यावसायिकांना सिंहस्थ कुंभमेळा ‘पर्वणी’ घेऊन येणार असून, त्या पार्श्वभूमीवर व्यापारी-व्यावसायिकांनी खास सिंहस्थासाठी स्टॉक करण्यास सुरुवात केली आहे. सिंहस्थकाळात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठांमध्ये आतापासूनच ‘सेल’ लागले आहेत.
जून ते सप्टेंबर या कालावधीत पावसाळ्यात बाजारपेठांमध्ये व्यावसायिक उलाढाल तशी कमीच असते. जूनमध्ये लग्नसराई संपलेली असते, तसेच विविध धार्मिक सण-उत्सव काळ वगळता इतर वेळी मंदीचेच वातावरण असते. या चार महिन्यांच्या काळात व्यापारी- व्यावसायिकांकडून नव्याने माल मागविला जात नाही अथवा कसला स्टॉकही करून ठेवला जात नाही. यंदा मात्र, सिंहस्थ कुंभमेळा असल्याने व्यापारी-व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक उलाढालीसाठी खास पर्वणी ठरणार आहे. सिंहस्थानिमित्त देश-विदेशातून लाखोने भाविक शहरात दाखल होणार आहेत. प्रामुख्याने पर्वणीकाळात भाविकांची संख्या कोटीत जाण्याची शक्यता आहे. शहरात येणारा भाविक हा तीर्थक्षेत्राहून काहीतरी खरेदी करत असतोच. त्यामुळे नाशकात सिंहस्थात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता आहे. पुणे येथील एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे दहा हजार कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तविला आहे. येत्या तीन महिन्यांच्या काळात मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग लाभणार असल्याने व्यापारी-व्यावसायिकांनी आतापासूनच जादा स्टॉक करण्यास सुरुवात केली आहे. सिंहस्थ पर्वणी लक्षात घेता बाहेरील व्यापारी-कंपन्यांचे प्रतिनिधी शहरातील व्यापारी-व्यावसायिकांकडे जादा मालाच्या नोंदणीसाठी पायधूळ झाडत आहेत. सिंहस्थाच्या निमित्ताने मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने कार्पोरेट कंपन्यांनीही आपल्या ब्रॅण्डिंगची तयारी चालविली आहे. साधुग्राम, गोदाघाट परिसर तसेच शहरातील मुख्य चौकांमध्ये जाहिरातींसाठी महापालिके बरोबर संपर्क साधला जात आहे. (प्रतिनिधी)