लोकोत्सव नव्हे लोकयातना उत्सव!

By Admin | Updated: September 29, 2015 00:22 IST2015-09-29T00:20:42+5:302015-09-29T00:22:22+5:30

लोकोत्सव नव्हे लोकयातना उत्सव!

Festival festival is not folk festival! | लोकोत्सव नव्हे लोकयातना उत्सव!

लोकोत्सव नव्हे लोकयातना उत्सव!

नाशिक : कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो करोडो लोक विशिष्ट दिवशी एकत्र जमतात, त्या बारा वर्षांनी भरलेल्या कुंभमेळ्यातील पर्वण्या अखेर पार पडल्या आणि त्यात कोणतीही दुर्घटना न घडल्याने साऱ्याच यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी यशस्वीतेचे ढोल बजावण्यास सुरुवात केली आहे. कुंभमेळ्यात दुर्घटना घडली नाही ही जमेची बाजू असली तरी कुंभमेळा खरोखरीच यशस्वी झाला काय, गावातील लोक यात सहभागी झाल्याने हा खरोखरीच लोकोत्सव झाला की सरकारी यंत्रणेचे मुखंड आणि मोजके लोकप्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते, राजकारण्यांशी संबंधित व्यावसायिक, ठेकेदार यांच्यापुरताच हा उत्सव मर्यादित राहिला, याची चिकित्सा करण्याची वेळ आली आहे. नव्हे ही चिकित्सा लोकभावनेने कधीच केली आहे. त्यामुळे हा लोकोत्सव झालाच नाही,
केवळ मोजक्या घटकांपर्यंतच तो मर्यादित राहिला. कुंभमेळा हा बारा वर्षांनी होणारा जागतिक दर्जाचा सोहळा असला आणि तो नाशिकमध्ये भरत असल्याने आपण सारेच भाग्यवान आहोत असे समजणाऱ्या नागरिकांना भविष्यात तर कुंभमेळ्यातील पर्वण्यांच्या नावांनीच अंगावर काटे उभे न राहतील तर नवलच! कुंभमेळ्याच्या नियोजनाला तशी तीन चार वर्षांपूर्वीच सुरुवात झाली असली तरी सर्व आराखड्यात पर्वणीच्या दिवशी एक कोटी भाविक येणार आणि त्यामुळे संपूर्ण शहरात अव्यवस्था होऊ शकेल अशा अंदाजानेच सारे नियोजन करण्यात आले. त्यातही कुणाचे दुमत नव्हते. परंतु साधूंसाठी साधुग्राम, बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळ, अंतर्गत वाहनतळ, बससेवा, रेल्वेसेवा असे नियोजन करताना नाशिककर कुठे राहतील, त्यांच्या सोयी-सुविधांचे काय याचा कोणत्याही आखाड्यात उल्लेख नव्हताच. आजी माजी पोलीस आयुक्तांनी तयार केलेल्या आणि त्यांना अन्य प्रशासकीय यंत्रणांनी मम म्हटलेल्या आराखड्यांमध्ये स्थानिक नागरिकांचा कोठेही विचार नव्हता. स्थानिक नागरिक काय कधीही काहीही सांगितले तर त्यांना ऐकावेच लागेल, अशा अविभार्वात सर्वसामान्यांना गृहीत धरून जे नियोजन झाले त्यातून एका पर्वणीला तीन दिवस म्हणजेच तीन पर्वण्यांना नऊ दिवस असे सर्व शहरच बंद ठेवण्याचा जालीम उपाय सुरक्षिततेच्या नावाखाली तयार करण्यात आला. शाळेत मुलांनी जायचे नाही, कामगारांनी कारखान्यात जायचे नाही, रुग्णांनी रुग्णालयात अगोदरच (आजार होण्याआधी) दाखल व्हा, दूध-पाणी जे काही पाहिजे, ते अगोदरच आणून ठेवा, नंतर कोणाला कोणत्याही सबबीवर बाहेर पडता येणार नाही एक प्रकारे घरातच सारे स्थानबद्ध अशा प्रकाराच्या धमक्यासदृश नियोजनाने सारेच निर्बंधाच्या चक्कीत पिसले गेले.
आम्ही कोणतेही निर्बंध घातले नव्हते, इतकेच नव्हे तर दुकाने बंद करायला सांगितले नव्हते असे नंतर सांगणाऱ्या पोलीस यंत्रणेने पहिल्या पर्वणीला मेनरोड परीसरात दुकानदारांना शिवीगाळ करीत आणि दंडुके मारत दुकाने बंद करायला लावली, हे मात्र कबूल केले नाही. निर्बंधाचा इतका अतिरेक होता की, नाशिक आणि पंचवटी अमरधाममधून अंत्ययात्रा परत पाठविण्यात आल्या. दक्षिण गंगा गोदावरीत क्रिया-कर्म विधीसाठी देशभरातून नागरिक येतात, परंतु येथे नाशिककरांना आपल्याच गावात रामकुंडावर जाण्यास मनाई करण्यात आली.
पर्वणीच्या दिवशी बाहेरगावातील नागरिक सोडाच परंतु स्थानिक भाविकांच्या नशिबी पाच सात किलोमीटरची पायपीट आली. बाहेरगावच्या नवख्या पोलिसांमुळे तर स्थानिक नागरिकांना इतका त्रास झाला की समोर रस्ता ओलांडून जाणे सहज सुलभ असताना प्रत्यक्षात पोलिसांकडून सरळ जाऊ देण्याऐवजी दोन किलोमीटरचा फेरा घालून या असे सांगितले जात असलाने नवख्या पोलिसांना समजवताना स्थानिक नागरिकांची नाकीनव येत होती.
बॅरिकेड तर गावभर इतके मनपूत लावण्यात आले होते की, संपूर्ण शहर बंदिस्त करण्याच्या या कृतीमुळे नंतर सोशल मीडियावर पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांना देशाच्या सीमा सील करण्यासाठी केंद्रात पाठवायला हवं अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल झाल्या. मग, कुठे यंत्रणेला शहाणपण आले परंतु अगोदरच्या नियोजनात फार बदल झाला नाही. काही भागातील बॅरिकेड हटविण्यात आल्या आणि शहर बस वाहतूक सुरू करण्यात आली. तसेच वाहतूक निर्बंध उशिरा लागू करण्यात आले. इतकीच काय ती जमेची बाजू. बाकी फार फरक पडला तर नाहीच, शिवाय पहिल्या पर्वणीमुळे जी नाचक्की झाली ती झालीच! एक कोटी भाविक आले नाहीत परंतु ते येणार म्हणून जो सर्वसामान्य नागरिकांना त्रास व्हायचा त्याच्या दसपट त्रास अतिरेकी नियोजनामुळे झाला.
नाशकात मानवता का मेला भरला असला तरी प्रत्यक्षात माणुसकीने कोणत्याही यंत्रणेने वागणूक दिली नाही. त्यामुळे कुंभमेळ्यात साधू-महंत आले. त्यांनी शाहीस्नान केले. या साऱ्या आठवणींपेक्षा पोलीस आणि शासकीय यंत्रणांचा जाच, त्यामुळे झालेले हाल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुंभमेळा आपल्यासाठी नव्हताच, ही भावनाच अधिक स्मरणात राहणारी ठरेल. बाकी नाशिककरांनी पर्वणीच्या दिवशी रामकुंडात कितपत स्नान केले, हे ज्याचे त्यालाच माहीत. (प्रतिनिधी)

Web Title: Festival festival is not folk festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.