जंगलात सुरक्षितस्थळी ठेवूनही, बछड्याकडे मादीची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 01:24 IST2021-01-11T19:29:56+5:302021-01-12T01:24:28+5:30
घोटी : बिबट्याचे संचारक्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे बिबट्याचे एक बछडे आईपासून दुरावून एका घराच्या पडवीत आश्रयाला आले. वनविभागाने दखल घेऊन या बछड्याला सुरक्षित ठेऊन त्याच्या आईची भेट घालून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याच्या मादीने या बछड्याकडे पाठ फिरविली आहे, तसेच या मादीचा ठाव लागत नसल्याने वनविभागासमोर पेच निर्माण झाला आहे.

जंगलात सुरक्षितस्थळी ठेवूनही, बछड्याकडे मादीची पाठ
काल पहाटे कुरुंगवाडी येथे बिबट्याचे दोन महिने वयाचे बछडे चुकून एका झोपडीच्या पडवीत आश्रयाला आले वनविभागाने दखल घेऊन, या बछड्याला संरक्षण देऊन त्याच्या आईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आज पहिल्या दिवशी हा प्रयत्न अपयशी ठरला. या बछड्याला पूर्ण सुरक्षित ठेऊन त्याच्या आहाराची काळजी वनविभागाने घेतली. वनविभागाचे पथक घटनास्थळी तळ ठोकून आहे. वनकर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त घालून बिबट्याच्या मादीचा शोध घेतला, ठसे निरीक्षण केले. मात्र, बिबट्याच्या मादीचा कोणताही ठाव मिळून आला नाही. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्याच्या मादीचा शोध घेऊन, बछडा आईच्या कुशीत स्वाधीन करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे. स्थानिक वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांचे पथक तळ ठोकून आहे. बिबट्याच्या मादीचा शोध घेण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली.