साधुग्राममध्ये आजारांची भीती
By Admin | Updated: September 1, 2015 00:17 IST2015-09-01T00:17:02+5:302015-09-01T00:17:58+5:30
कचऱ्याचे साम्राज्य : नागरिकांचा मास्क लावून फेरफटका

साधुग्राममध्ये आजारांची भीती
नाशिक : कुंभमेळ्यात शहर स्वच्छतेसाठी परराज्यातून दोन हजार कर्मचाऱ्यांना पाचारण केल्याचा दावा केला जात असताना, गेल्या काही दिवसांपासून साधुग्रामच्या अंतर्गत भागांत स्वच्छता कर्मचारीच फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कचरा साठला असून, आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, या भीतीमुळेच साधुग्राममध्ये फेरफटका मारण्यासाठी येणारे नागरिक चेहऱ्याला मास्क लावूनच प्रवेश करीत आहेत.
कुंभमेळ्यात साधुग्रामसह शहराच्या अन्य भागांत प्रचंड कचरा निर्माण होणार असल्याने महापालिकेने ठेकेदारांमार्फत परराज्यांतील सुमारे दोन हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांना नाशिकमध्ये पाचारण केले होते; मात्र ठेकेदारांनी या कर्मचाऱ्यांना निवास, शौचालये, चहा, नाश्ता, भोजन यांपैकी कोणतीही सुविधा पुरवली नाही. त्यांना अक्षरश: वाऱ्यावर सोडल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी काही दिवसांतच शहरातून पलायन केले. त्यानंतर पर्यायी कर्मचारी नेमण्यात आले की नाही, याविषयी अनभिज्ञता आहे. दरम्यान, प्रारंभी साधुग्राममध्ये जिकडेतिकडे स्वच्छता कर्मचारीच दिसत असताना, गेल्या काही दिवसांपासून मात्र अंतर्गत भागांत स्वच्छताच होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे बऱ्याच भागांत कचऱ्याचे ढीग साचले आहेत. याबाबत साधूंमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात एकीकडे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत असताना, या कचऱ्यामुळे रोगराईत वाढ होण्याची भीती आहे. ती लक्षात घेऊन साधुग्राममध्ये फेरफटका मारण्यासाठी येणारे भाविक चेहऱ्याला मास्क लावूनच आत प्रवेश करीत आहेत. या भागांत आणखी महिनाभर साधूंचे वास्तव्य राहणार असून, स्वच्छता न केल्यास परिस्थिती गंभीर होण्याची चिन्हे आहेत.