डांगसौंदाणे कामांच्या चौकशीसाठी उपोषण सुरू
By Admin | Updated: January 3, 2017 02:07 IST2017-01-03T02:05:59+5:302017-01-03T02:07:29+5:30
मालमत्तेचा दुरुपयोग : सदस्यावर कारवाईची मागणी

डांगसौंदाणे कामांच्या चौकशीसाठी उपोषण सुरू
नाशिक : जिल्हा परिषदेच्या पठावे दिघर गटातील कामांची चौकशी करावी, तसेच शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गटाचे सदस्य सिंधूताई सोनवणे व संजय सोनवणे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. २) जिल्हा परिषदेसमोर डांगसौंदाणे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पठावे दिघर जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषदेची निकृष्ट कामे झालेली आहेत. तसेच डांगसौंदाणे येथे ९० लाखांचा बंधारा तोडून शासकीय मालमत्ता उद््ध्वस्त करून मंगल कार्यालय बांधकाम प्रकरणी अनेक वेळा पत्रव्यवहार करून गेली सहा महिने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालय येथे निवेदने देऊनही काहीही उपयोग झालेला नाही. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्हा परिषदेला पत्र पाठवून तीन दिवसांत अहवाल मागविला होता. मात्र त्यावरही काहीही कारवाई झालेली नाही. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यासाठीच जिल्हा परिषदेकडून चौकशी लांबविली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जलसंपदा विभागाने शासकीय मालमत्तेच्या नुकसान प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे पत्र देऊनही कार्यवाही झाली नाही तर आमरण उपोषण करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.