भ्रष्टाचाराविरुद्ध चक्क स्त्री वेशभुषेत आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 14:55 IST2020-03-03T14:52:17+5:302020-03-03T14:55:45+5:30
आठवडाभरापासून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी स्री वस्त्र परिधान करून आमरण उपोषण पुकारले आहे.

भ्रष्टाचाराविरुद्ध चक्क स्त्री वेशभुषेत आमरण उपोषण
नाशिक : सहकार, कृषी आणि तहसील कार्यालयाचा गलथान कारभार व भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याच्या निषेधार्थ चांदवड तालुक्यातील रहिवासी माहिती अधिकार महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र खंगळ यांनी मागील आठवडाभरापासून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त करण्यासाठी स्री वस्त्र परिधान करून आमरण उपोषण पुकारले आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी (दि.२) जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
तहसील कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या रेशन दुकानांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणूनदेखील संबंधितांकडून केवळ दुकाने निलंबनाची कारवाई केली गेली मात्र मयत व्यक्ती, बाहेरगावी वास्तव्यास गेलेले लोक यांच्या नावांसह दुबार धान्य वाटप केल्याप्रकरणी त्यांच्याकडून भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करण्याची मागणी खंगळ यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयासह विभागीय कार्यालयाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. त्यांनी याबाबतचा १६४ पानांचा अहवालदेखील या कार्यालयांकडे उपोषणापूर्वीच सादर केला होता, मात्र त्याची कुठलीही दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कृषी विभागाच्या अखत्यारितीत येणा-या चांदवड तालुक्यातील बोगस खतसाठा करणा-या दुकानांवर कारवाई करावी. ज्या खतविक्री करणा-या दुकानदारांकडून परवान्यांची प्रत प्रथमदर्शनी भागात लावलेली नाही, त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच सहकार खात्याच्या अखत्यारित येणाºया चांदवड तालुका सहकारी खरेदी-विक्री संघातील घोटाळ्याच्या प्रकरणात विभागीय सहायक निबंधकांनी चौकशी करून फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहे. मात्र सहायक निबंधक कार्यालयाकडून याबाबत चालढकल केली जात असल्याचा आरोपही खंगळ यांनी केला आहे.
--