वनविभागाच्या विरोधात तहसीलसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:11 IST2020-08-11T21:58:17+5:302020-08-12T00:11:16+5:30
नांदगाव : वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकाराचा दुरुपयोग करत मनमानी कारभार करित असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुरेश शेळके, संपत पवार व संतोष बिन्नर यांनी दिले आहे.

वनविभागाच्या विरोधात तहसीलसमोर उपोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांचे सहकारी अधिकाराचा दुरुपयोग करत मनमानी कारभार करित असल्याच्या निषेधार्थ १५ आॅगस्ट रोजी जुन्या तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन तहसीलदार उदय कुलकर्णी यांना सुरेश शेळके, संपत पवार व संतोष बिन्नर यांनी दिले आहे.
निवेदनाच्या प्रती नाशिकचे उपवनसंरक्षक, चांदवडचे सहायक उपवनसंरक्षक, नांदगावचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. मौजे हिरेनगर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समिती, तसेच ग्राम वनसमितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता टू टेन जेसीबी व ट्रॅक्टर या यंत्राद्वारे जंगलातील काळी कसदार माती उपसा करणे, वृक्षतोड, परगावाहून आलेल्या व्यक्तींचे कुठलेही कागदपत्र न तपासता स्वत:च्या अधिकारात पक्के घरे बांधण्याची तोंडी परवानगी देणे, लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यास असमर्थ तसेच संयुक्त वन व्यवस्थापन समिती व इतर समित्यांना आलेला निधी समित्यांच्या खात्यावर वर्ग न करता स्वत:च्या खात्यावर जमा करून बनावट सह्यांच्या आधारे निधीचा गैरवापर केल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
आमदार सुहास कांदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आमसभेतही वरिल अधिकाऱ्यांच्या बाबतीत आरोप करण्यात आले. वनपरिमंडळ अधिकारी सोनवणे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असा आदेश देण्यात आला असून, तशी नोंद आमसभेच्या इतिवृत्तात करण्यात आलेली आहे.