शेतकऱ्यांनो द्राक्ष, कांदा, भाजीपाला जपा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:51 IST2020-12-15T20:11:58+5:302020-12-16T00:51:28+5:30
नाशिक : मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली असून, ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ५८ हजार हेक्टरवर द्राक्ष लागवड झाालेली आहे. ढगाळ वातावरणाचा गहू, हरभऱ्यापेक्षाही द्राक्ष, नवीन लागण झालेला कांदा, कांदा रोप आणि भाजीपाला पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, या पिकांवर डावणीसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनो द्राक्ष, कांदा, भाजीपाला जपा
सध्या द्राक्ष पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी द्राक्षामध्ये साखर उतरण्याची प्रक्रिया सुरू आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे आणि बेमोसमी पावसामुळे पिकाच्या वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत असून, वातावरण निवळल्यानंतर मण्यांना क्रॅक पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची झोप उडाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली असून कांद्याच्या उगवणक्षमतेवरही वातावरणाचा परिनाम होऊ लागला आहे. अनेक शेतकऱ्यांचे कांद्याचे रोप पातळ पडले आहे. काही ठिकाणी रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्वच प्रकारच्या भाजीपाला आणि फळ पिकांवर ढगाळ वातावरणाचा परिणाम जाणवू लागला आहे. अशा वातावरणात भाजीपाला पीक लवकर रोगांना बळी पडत असल्याने शेतकऱ्यांनी विविध कीटकनाशकांची फवारणी सुरू केली आहे.
जिल्ह्यातील पीकनिहाय रब्बीचे क्षेत्र (हेक्टर)
गहू - २८,६५५
हरभरा - १९,६८९
ज्वारी - २,१७५
कांदा - ७८,४७९.४५
द्राक्षाला सर्वाधिक फटका
मागील पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, काही भागात तर सूर्यदर्शनच झालेले नाही. यात मागील दोन दिवसात जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने द्राक्ष, कांदा, गहू आणि भाजीपाला ही पिके धोक्यात आली आहेत. सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पदकांना बसला असून, शेतकऱ्यांना दररोज वेगवेगळी कीटकनाशक आणि पोषकांची फवारणी करावी लागत आहे.
प्रमाणित कीटकनाशकांची फवारणी करा
ढगाळ वातावरणापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रमाणित कीटकनाशकांची वेळच्या वेळी फवारणी करावी. द्राक्षबागांमधील तपमान स्थिर रहाण्यासाठी उपाययोजना कराव्यात भाजीपाला पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेळीच औषध फवारणी करावी.
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष, कांदा, भाजीपाला, कांदा रोप, नवीन लागवड केलेला कांदा या पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच काळजी घेऊन पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. - कैलास शिरसाट, कृषी उपसंचालक, नाशिक