दिंडोरी : तालुक्यातील लखमापूर औद्योगिक वसाहतीतील एका फर्टिलायझर कंपनीतून निघणाऱ्या सूक्ष्म कणांच्या वायू प्रदूषणामुळे परमोरी शिवारातील द्राक्ष पिकांसह शेती पिकाचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अनेक यंत्रणांकडे दाद मागूनही उपाययोजना होत नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेत आपली व्यथा मांडली. ओझरखेडचे सरपंच गंगाधर निखाडे, ज्ञानेश्वर तिडके, शालिराम काळोगे, सदानंद शिवले, वाल्मीक काळोगे, रमेश जाधव, संतोष जमधडे, गोरख बोराडे, विष्णू पाटील, राकेश दिघे, रोशन दिघे, रमेश दिघे, संदीप काळोगे आदी ओझरखेड, परमोरी, वरखेडा ग्रामस्थांनी सदर कंपनीच्या प्रदूषणामुळे द्राक्ष पिकासह विविध शेतमालाचे नुकसान होत असल्याने सदर प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना कराव्यात यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींना निवेदने दिली. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या.
-----------------------
पिकांवर दुष्परिणाम, अहवाल सुपुर्द
गेल्या पंधरा वर्षांपासून शेतकरी प्रदूषणामुळे त्रस्त आहे. कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त द्राक्ष शेतीची पाहणी केली. सदर कंपनीचे वायू प्रदूषणाने नुकसान होत असल्याचा प्राथमिक अहवाल देत प्रदूषण नियंत्रण मंडळास पाहणीस बोलावून पिकांवर दुष्परिणाम करणाऱ्या विषारी वायूवर निर्बंध आणण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करीत पंचनामे करून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र, अद्याप कोणतीही उपाययोजना केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत त्वरित प्रदूषण रोखावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.