शेतकऱ्यांना फळपीक अनुदान तत्काळ द्यावे

By Admin | Updated: April 18, 2016 00:03 IST2016-04-17T23:05:36+5:302016-04-18T00:03:26+5:30

सटाणा : भामरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Farmers should give fruit crop immediately | शेतकऱ्यांना फळपीक अनुदान तत्काळ द्यावे

शेतकऱ्यांना फळपीक अनुदान तत्काळ द्यावे

सटाणा : खरीप हंगामातील संपूर्ण पीक दुष्काळी स्थितीमुळे हातातून गेले आहे, मात्र शासनाने शेतकऱ्यांना अनुदान देताना अतिशय चुकीचे आणि अवास्तव निकष लावल्याने बागायती आणि फळपिकांचे अनुदान अद्यापही मिळू शकलेले नाही. यामुळे शेतकरी वर्गात कमालीची नाराजी असून, शासनाने हे सर्व गैरलागू निकष मागे घेऊन सातबाऱ्यावरील नोंद गृहीत धरून अनुदानाचे तत्काळ वाटप करावे, अशी मागणी बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र भामरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शासनाने दुष्काळ जाहीर करून अनुदान देण्याची घोषणा केली; मात्र त्यासाठी पंचनामे, जीपीएस फोटो, स्थानिक समिती असे एक ना अनेक निकष लागू केले. त्यामुळे प्रत्यक्ष अनुदान वाटप करणे अशक्य असल्याने राज्यभरातील अनुदान पडून आहे. दुसरीकडे अभूतपूर्व दुष्काळामुळे शेतकरी वर्ग आत्महत्त्यासारखे मार्ग पत्करत आहे.
प्रशासनाने निकष शिथिल करण्यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागितले. परंतु पुन्हा जीपीएस फोटो, स्थानिक चौकशी, विहिरींतील पाणी आणि लागवड, उत्पादन आदि निकष कायम ठेवले. त्यामुळे अजूनही कोरडवाहू वगळता
उर्वरित बागायती आणि फळपिकांचे अनुदान वाटप होऊ शकलेले
नाही.
बागलाणसह जिल्ह्यातील बहुतांश भागात मोबाइलला रेंज नसल्यामुळे ही जीपीएस यंत्रणा कुचकामी ठरणार असल्याचे बघता शासनाने हे निकष मागे घेऊन थेट सातबाऱ्यावरील नोंदीनुसार अनुदान वाटप करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
पुढील हंगाम लवकरच सुरू होणार असून, शेतकरी वर्गाला नव्याने उभारी देण्यासाठी भांडवलाची नितांत गरज आहे. त्यामुळे शासनाने सरसकट सगळ्यांनाच तत्काळ अनुदान मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्याचे निर्देश संबंधित यंत्रेणाला द्यावेत, अशी गळही निवेदनात घालण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत मध्यस्थी करावी, अशी विनंतीही निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmers should give fruit crop immediately