शेतकऱ्यांनी उद्योगधंद्यातही उतरावे
By Admin | Updated: September 12, 2015 22:16 IST2015-09-12T22:00:55+5:302015-09-12T22:16:22+5:30
सिन्नर : महादेव जानकर यांचे उत्साहात स्वागत; दुष्काळग्रस्तांना सबुरीचा सल्ला

शेतकऱ्यांनी उद्योगधंद्यातही उतरावे
सिन्नर : आपल्या पोटात जे आहे तेच ओठावर येते. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असल्याचे बोलले जात असले तरी त्यात तथ्य नाही. मात्र सरकार महायुतीचे नसून ते भाजपा-सेनेचे असल्याची खंत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व आमदार महादेव जानकर यांनी वावी येथील कार्यक्रमात व्यक्त केली. दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला असूनही त्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला देत शेतकऱ्यांनी आता उद्योग-धंद्यातही उतरण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
जानकर यांची वावी येथे सभा पार पडली. दुष्काळाला घाबरून न जाता चारा डेपो व जनावरांच्या छावण्यांसाठी प्रस्ताव पाठवावे, ते मंजूर केले जातील असे सांगितले. येत्या १५ तारखेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांची वीजबिले व विद्यार्थ्यांची फी माफ करण्याबाबत विचार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतकऱ्यांनी आपल्या एका मुलास अधिकारी, तर दुसऱ्याला उद्योगपती करावे आणि एका मुलास राजकारणात पाठवावे. राजकारण वाईट नसल्याचे जानकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीसोबतच उद्योगधंद्यात उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.(वार्ताहर)