पालखेडच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन
By Admin | Updated: February 22, 2017 23:30 IST2017-02-22T23:30:20+5:302017-02-22T23:30:34+5:30
येवला : आवर्तनातून चारीवरील पाणीवापर संस्थांना पाणी देण्याची मागणी

पालखेडच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे निवेदन
येवला : पालखेडच्या दुसऱ्या आवर्तनात चारी क्रमांक ३८ व ३९ वरील पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांना पाण्याचा कोटा मिळाला नसल्याने सदरचा कोटा मिळावा, असे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने पालखेड कार्यालयाचे लिपिक डी.व्ही. शेवाळे यांच्याकडे देण्यात आले. दुसरे आवर्तन चालू झाल्यानंतर चारी क्र. ३८ ते ४५ पर्यंतच्या सर्व चाऱ्या या एकत्रित चालू होतात. पाटाचे पाणी डोंगळे टाकून उचलले जात असल्याने पाणी कमी प्रमाणात होते. त्यामुळे चारी क्रमांक ३८ व ३९ या बंद ठेवण्यात आल्या होत्या.
ज्यावेळी चारीला पाणी सोडण्यात आले, तेव्हा ते कमी प्रमाणात चालू होते. त्यात चारीच्या मुखाशी काही शेतकऱ्यांनी
बांध फोडल्याने थोडे फार सुरू असणारे पाणी बंद झाले. यामुळे काही भागात चारी ओलीदेखील झाली नाही. पाणी सोडल्यानंतर पालखेड विभागाचे कोणीही अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही त्यामुळे पाणी चोरीला जात असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. त्यामुळे सदर हक्काचे पाणी तत्काळ मिळावे अन्यथा उपोषणास बसण्याचा निर्णय संतप्त शेतकऱ्यांनी केला आहे. निवेदन देते वेळी रंगनाथ भोरकडे, राजेंद्र वाणी, जयराम मोरे, संदीप खैरनार, दादासाहेब तनपुरे, अशोक शिंदे, यशवंतराव शिंदे, संजय शिंदे, शंकरराव कदम, अमोल शिंदे, राजेंद्र
काळे, ज्ञानेश्वर कटके, श्रावण बेंडके, दीपक गायकवाड, माधव देशपांडे, भय्यासाहेब शिंदे, काकासाहेब शिंदे, शरद शिंदे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)