सीमेंटचा रॅक उतरविण्यास शेतकऱ्यांचा विरोध
By Admin | Updated: March 29, 2017 01:04 IST2017-03-29T01:04:36+5:302017-03-29T01:04:48+5:30
कसबे सुकेणे : खेरवाडी येथील मालधक्क्यावर सीमेंटचा रॅक उतरविण्यास ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध करत तब्बल तीन तास रास्ता रोको केला.

सीमेंटचा रॅक उतरविण्यास शेतकऱ्यांचा विरोध
कसबे सुकेणे : खेरवाडी येथील मालधक्क्यावर सीमेंटचा रॅक उतरविण्यास ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विरोध करत तब्बल तीन तास रास्ता रोको केला. रॅक न उतरविण्याची रेल्वे प्रशासन व व्यापाऱ्यांकडून हमी मिळाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला.
मध्य रेल्वेच्या नाशिकरोड ते कसबे सुकेणे स्थानकादरम्यान खेरवाडी येथे मालधक्का आहे. जिल्ह्यातील कांदा व इतर मालांची येथे चढ-उतार होते. सीमेंटच्या धुळीमुळे या भागातील शेती व मानवी आरोग्य प्रभावित झाल्याने मालधक्क्यावर सीमेंटचा रॅक उतरविण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. तसा या गावाने ठराव करून व्यापाऱ्यांकडून लेखी हमी घेतली असल्याचे समजते. परंतु सकाळी ८ वाजेच्या सुमारास सीमेंटचा रॅक मालधक्क्यावर लागला असल्याचे शेतकऱ्यांना समजताच खेरवाडी येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरले. हा रॅक कुठल्याही परिस्थितीत उतरविला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. पंचायत समिती सदस्य रत्ना संगमनेरे, अनिल संगमनेरे, सुभाष आवारे, दशरथ संगमनेरे, विजय नागरे, अॅड. जीवन संगमनेरे, रमेश संगमनेरे आदिंनी रॅक उतरविण्यास विरोध असताना परिसरातील नागरिकांशी व शेतीशी व्यापारी वर्ग का खेळ करतात, असा सवाल करत रस्त्यावर ठाण मांडले. काही वेळातच आमदार अनिल कदम, कसबे सुकेणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदार कदम यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करु न ठेकेदार व प्रशासनाकडून सीमेंट रॅक न उतरवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तणाव निवळला. (वार्ताहर)