नायगाव खोऱ्यातील शेतकरी चिंताग्र्रस्त

By Admin | Updated: November 17, 2015 22:26 IST2015-11-17T22:21:42+5:302015-11-17T22:26:03+5:30

रब्बीची आशा धूसर : मऱ्हळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या जागेतील विहिरीचे पाणी शेतीला

The farmers of the Naigaon valley worry about | नायगाव खोऱ्यातील शेतकरी चिंताग्र्रस्त

नायगाव खोऱ्यातील शेतकरी चिंताग्र्रस्त

नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खोऱ्यातील पाण्याची पातळी दिवसागणिक झपाट्याने खालावत चालल्याने रब्बीच्या आशा धूसर होत असून, बळीराजा चिंता व्यक्त करत आहे.
परिसरात गेल्या पाच वर्षांपासून सतत दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडला होता. चालू वर्षी पावसाने उशिरा हजेरी लावल्याने खरिपापाठोपाठ रब्बीच्या पिकांचेही नियोजन चुकले होते. मात्र समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन करून विविध पिकांची लागवड केली आहे. तथापि, पिकवलेल्या टमाटे, फ्लॉवर, कोबी यांसारखी पिके बाजारात मातीमोल भावात विकावे लागल्याने खरिपाचे खर्च केलेले पैसेही वसूल झाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. मात्र अशा परिस्थितीतही न डगमगता कर्जाऊ, उसनवारी करत पुन्हा रब्बीच्या पिकांची लागवड केली. सध्या सर्वच परिसरात रब्बीची पिके जोमात आहेत.
दरम्यान, खरिपाची कसर रब्बीच्या पिकांमधून मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नगदी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली आहे. नायगाव खोऱ्यातील शेतकरी कांदा उत्पादनात आघाडीवर असतात. यावेळी शेतकऱ्यांनी कांदा लागवड क्षेत्रात वाढ केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र गेल्या महिनाभरापासून परिसरातील सर्वच बंधारे कोरडे पडू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.
परिसरातील पाण्याची पातळी सध्या दिवसागणिक खालावत आहे. परिसरातील काही भागातील विहिरी सध्या काही तासांवरच चालत असल्याने रब्बीच्या विविध पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. सध्या काही पिकांची लागवड सुरूच असताना या पिकांच्या उत्पादनावर पाणीटंचाईचे ढग सुरुवातीपासूनच जमू लागल्याने रब्बीचे केलेले नियोजन कोलमडताना दिसत आहे. झपाट्याने खालावत असलेल्या पाणीपातळीचा विचार करता अर्ध्यावर आलेले पीक घ्यावे की नवीन घेतलेले पीक वाचवावे या द्विधा मन:स्थितीत सध्या बळीराजा सापडला आहे. खरिपापाठोपाठ रब्बीच्या आशाही धूसर दिसू लागल्याने शेतकरी चिंंताक्रांत झाला आहे.
पाण्यासाठी ग्रामस्थांचा टाहो
सिन्नर : ग्रामपंचायतीने भाडेतत्त्वावर दिलेल्या जागेचा करार संपूनही जागा व त्यातील विहिर खासगी व्यक्तीच्या ताब्यात असून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची तक्रार शीलाबाई बाबूराव आढाव या महिलेने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीच्या जागेतील हक्काचे पाणी मिळावे यासाठी सदर महिला गेल्या अनेक दिवसांपासून प्रशासनासोबत लढत असल्याचे दिसते.
१९९५ साली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मऱ्हळ बुद्रुक येथील ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक २२७ मधील १० गुंंठे जागा राधू शंकर कुऱ्हे यांना २१६ रुपये वार्षिक कराराने १५ वर्षांसाठी कराराने देण्यात आली होती. या जागेवर कुऱ्हे यांनी विहीर व कूपनलिका खोदली असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे. जागेचा करार २०१० मध्ये संपला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर जागेचा भाडेकरार संपल्यानंतरही कुऱ्हे यांच्या ताब्यात सदर ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायतीची जागा पाझर तलावाजवळ आहे. त्यामुळे या विहिरीला उन्हाळ्यातही भरपूर पाणी असते. कुऱ्हे विहिरीतील पाण्यावर शेती करीत आहेत, तर गावासाठी पंचायत समितीमार्फत पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे चित्र आहे.
सदर व्यक्तीने मुदत संपल्यानंतर तलाठ्याकडून या उताऱ्यावर खोटी नोंद केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सदर व्यक्ती विहिरीवर कोणालाही पाणी भरू देत नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या अर्जाचा विचार करून तातडीने कार्यवाही करून गावकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्याची मागणी आढाव यांनी निवदेनात केली आहे.
तळेगाव रोहीत दुष्काळाचे सावट
चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही परिसरात १९७२ नंतर तब्बल ४३ वर्षांनंतर अशी दुष्काळातील प्रथमच दिवाळी आल्याचे जुनेजाणते लोक सांगत आहेत. सन १९७२ च्या दुष्काळात खडी फोडली गेल्याचे वृद्ध सांगतात. तेव्हा दुष्काळात शंभर ग्रॅम सुकडीचा डबा दिला जायचा व रेशनची ज्वारी, मका, गहू मिळायचे. पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटरपर्यंत भटकंती व्हायची.
परिसरात कमी पावसामुळे मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिके वाया गेली. मका एकरी दोन क्विंटल, सोयाबीनला फुले आली पण शेंगा किरकोळ आल्या. सोयाबीन एकरी सरासरी एक क्विंटल, तर भुईमुगाच्या पायलीचे शेंगदाणे टाकून त्याला एक पोतं शेंगा येत नाही व सरासरी उतारा मिळत नाही. मूग, उडीद, तूर याचे विचारूच नका. पेरलेले बियाणे निघत नाही. बाजरीदेखील एकरी तीन ते चार पायली निघत नाही. बाजरी, मक्याची उंची तीन फूट असल्यामुळे चारा नाही. सध्या बाहेरील तालुक्यातून जनावरांचा चारा विकत घेतला जात आहे. दि. १८ सप्टेंबरला राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला पण या परिसरात वरुणराजाची वक्रदृष्टी झाली. जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविणे, बांधबंदिस्ती, शेताचा बांध बंदिस्त करणे, विहीर पुनर्भरण योजना प्रभावी व वेळेत राबविल्यास मजुरांना याचा फायदा होईल. ही दिवाळी दुष्काळी परिस्थितीत साजरी झाली. भुसार धान्य विक्री करून बाजारहाट करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती.
या परिसरातील आणेवारी ४९ पैशांच्या आत असून, शासनाने त्वरित चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी परिसरातून होत आहे अन्यथा पशुधन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल. विहिरींनी तळ गाठला असून, कांदा पिकासाठी शेतकरी खर्च करून बसला आहे. (वार्ताहर )

Web Title: The farmers of the Naigaon valley worry about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.