करंजगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, भीती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 15:45 IST2020-12-20T15:44:45+5:302020-12-20T15:45:22+5:30
चांदोरी : रात्रीच्यावेळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी जात असलेल्या शेतक-यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना निफाड तालुक्यातील करंजगाव येथे शुक्रवारी (दि.१८) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, परिसरातील शेतकरी वेळीच धाऊन आल्यामुळे सदर शेतकऱ्याचे प्राण वाचले. मात्र या घटनेमुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

करंजगावी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी, भीती कायम
निफाड तालुक्यातील करंजगाव येथे रमेश राजोळे हे शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी रात्रीच्यावेळी जात होते. यावेळी अंधारात झाडाझुडपात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांना जबड्यात धरल्यानंतर त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी परिसरात शेतीपिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यामुळे बिबट्याने जबड्यातून राजोळे यांना सोडून पुन्हा झाडाझुडपात धूम ठोकली. राजोळे यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा बिबट्याने त्याची दहशत कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वनविभाकडून शेतकऱ्यांना अपेक्षा
गोदावरी नदीकाठच्या गावांना मुबलक पाणी उपलब्ध असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊसाची शेती केली जाते. मात्र, सध्या सुरु असलेल्या भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, रात्रीच्यावेळी मिळणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांना रात्री पाणी देणे सोयीचे ठरत आहे. मात्र, रात्रीच्यावेळी बिबट्याचे दर्शन घडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे यापुढील काळात वनविभागाकडून या भागात पिंजरा लावण्यात यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.