एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फुलली शेती

By Admin | Updated: March 26, 2017 22:54 IST2017-03-26T22:53:54+5:302017-03-26T22:54:11+5:30

सटाणा : जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांनी पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी श्रीपूरवडे पॅटर्न तयार करून नावारूपाला आणला आहे.

Farmers flourished in more than one thousand hectare area | एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फुलली शेती

एक हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फुलली शेती

सटाणा : लोकप्रतिनिधीची इच्छाशक्ती जर प्रबळ असली तर कोणतेही अशक्य काम शक्य होऊ शकते. अशीच प्रबळ इच्छाशक्ती असलेले जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांनी पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी श्रीपूरवडे पॅटर्न तयार करून नावारूपाला आणला आहे. त्यामुळे आता शिरपूर नव्हे, तर श्रीपूरवडे पॅटर्न कसमादे पट्ट्यात रोल मॉडेल म्हणून पुढे आले आहे. या पॅटर्नमुळे बागलाण तालुक्यातील तब्बल सहा गावे ओलिताखाली येऊन बागायती क्षेत्रात एक हजार हेक्टरहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे शेतशिवार पिकांनी फुलू लागले असून, हिरवाईने नटले आहे.  बागलाण तालुक्यातील जायखेडा गट हा मोसम आणि करंजाडी या दोन नद्यांमुळे सुपीक मानला जात असला, तरी पावसाचा लहरीपणा, धरणामधील पिण्यासाठी आरक्षित झालेला पाणीसाठा यामुळे हा सुपीक परिसर पाण्याअभावी अक्षरश: उजाड होत चालला होता. या गटातील उत्राणे, श्रीपूरवडे, टिंगरी, वाघळे, राजपूरपांडे, खामलोण, तळवाडे ही गावे अक्षरश: टॅँकरग्रस्त झाली होती. टंचाईच्या झळांनी हा परिसर होरपळून निघत होता. या गटाचे जिल्हा परिषद सदस्य यतिन पगार यांनी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून शासनदरबारी मोठा प्रकल्प न मागता लहान लहान प्रकल्प तयार करण्यावर भर दिला. तब्बल दोन वर्षे पाठपुरावा करून विविध योजनांमधून टिंगरी, श्रीपूरवडे, उत्राणे गावांमधून जाणाऱ्या भिवरी नाल्यामधून मोसम नदीत वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी तब्बल पंधरा सीमेंट प्लग बंधारे साखळी पद्धतीने बांधले. यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे तब्बल बेचाळीस दशलक्ष घनफूट पाणी अडविण्यात यश मिळाले आहे. श्रीपूरवडे पॅटर्नमुळे फुलले शेतशिवार...
जायखेडा गटातील प्रत्येक गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रामाणिकपणे पावले उचलत आहोत. तसा कृती आराखडादेखील तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला आपण गटातील रस्त्यांचे जाळे मजबूत करण्यावर भर दिला, जेणेकरून दळणवळण सुरळीत होईल. त्यासाठी यंदा जनतेच्या मागणीनुसार करंजाड-भुयाणे-निताणे-बिजोटे-आखतवाडे-आनंदपूर-आसखेडा या सोळा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी चार कोटींचा निधी नुकताच प्राप्त झाला आहे. तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, खासदार हीना गावित यांच्या माध्यमातून प्रलंबित हिंदळबारीच्या कामासाठी साडेसहा कोटींचा निधी मिळविला आहे. (वार्ताहर)
प्रभावीपणे सिंचन योजना राबवून बागलाणमध्ये नव्याने श्रीपूरवडे पॅटर्न आता नावारूपाला आला आहे. याच पॅटर्नमधून नालाजोड संकल्पनादेखील पगार यांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न केला आहे. भिवरी नाला ओव्हरफुल झाल्यानंतर वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी उत्राणे, तळवाडे, खामलोण शिवारात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पगार यांनी सेसच्या निधीमधून भिवरी नाल्याचे पाणी आवळाई नाल्यात टाकून नालाजोड प्रकल्प यशस्वी केला. आज श्रीपूरवडे पॅटर्नमुळे तब्बल बेचाळीस दशलक्ष घनफुटाहून अधिक पाणी अडवले गेल्यामुळे टिंगरी, श्रीपूरवडे, वाघळे, राजपूरपांडे, उत्राणे, तळवाडे, खामलोण शेतशिवारातील भूगर्भ पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पाण्याची पातळी वाढल्यामुळे कोरड्या झालेल्या विहिरी पाण्याने भरून यंदा एक हजार हेक्टरहून शेतजमीन ओलिताखाली आली आहे. यामुळे संपूर्ण शेतशिवार पिकांनी फुलू लागले आहे.

Web Title: Farmers flourished in more than one thousand hectare area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.