हिंदी साहित्यात शेतकरी, विकलांग घटक उपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:18+5:302021-06-26T04:11:18+5:30
प्रा. पाटील : येवला महाविद्यालयात चर्चासत्र येवला : साठोत्तरी कालखंडातील दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, किन्नर या प्रवाहांची चर्चा, समीक्षा मोठ्या ...

हिंदी साहित्यात शेतकरी, विकलांग घटक उपेक्षित
प्रा. पाटील : येवला महाविद्यालयात चर्चासत्र
येवला : साठोत्तरी कालखंडातील दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, किन्नर या प्रवाहांची चर्चा, समीक्षा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मात्र शेतकरी, विकलांग, भिकारी हे विमर्श समीक्षादृष्ट्या अजूनही उपेक्षित आहेत. यांची समीक्षा व संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. पंढरीनाथ पाटील यांनी केले.
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय आणि महात्मा गांधी विद्यामंदिर प्रणित हिंदी अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘२१ वी सदी के हिंदी साहित्य में विविध विमर्श’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून नगाव-धुळे येथील गंगामाई महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉ. पंढरीनाथ पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे होते. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या विश्वस्त डॉ. योगिता हिरे, येवला महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष तथा निमगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम उपस्थित होते. चर्चासत्राचे उद्घाटन कला व मानव्यविद्या विद्याशाखेच्या अधिष्ठाता मानसशास्त्रज्ञ डॉ. मृणाल भारद्वाज यांनी केले. दलितच फक्त दलित साहित्य लिहितील, आदिवासी लेखकांनी फक्त आदिवासींविषयी लिहावे, स्त्री लेखिकांनीच फक्त स्त्रीवादी लेखन करावे, अपंग व्यक्तीने अपंग साहित्य लिहावे असे विभाजन साहित्य सृजन आणि साहित्य समीक्षेला मर्यादित करणारे असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रा. डॉ. अनिता नेरे (मालेगाव), प्रा. डॉ. धनराज धनगर यांनी चर्चेत सहभाग घेतला.
अध्यक्षीय मनोगत प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक हिंदी अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. पूनम बोरसे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. कैलास बच्छाव यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. रघुनाथ वाकळे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र ठाकरे यांनी केले.