हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:37+5:302021-03-13T04:26:37+5:30
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर येथील काळे मळ्यानजीक शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यावर हिंंस्त्र प्राण्याने हल्ला करुन त्याला ...

हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
सिन्नर : तालुक्यातील धोंडवीरनगर येथील काळे मळ्यानजीक शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय शेतकऱ्यावर हिंंस्त्र प्राण्याने हल्ला करुन त्याला ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या परिसरात गेल्या चार दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले असून सदर शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला असून स्बॅब घेऊन तपासणीसाठी हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठविला आहे. घटनास्थळी वनविभागाने पिंजरा लावला आहे.
राजाराम त्र्यंबक सोनवणे (६५) हे शेतकरी मुलगा व पत्नीसह काळे मळ्यात राहतात. गुरुवारी रात्री सोनवणे हे पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा किंवा पहाटे घरी परत न आल्याने कुटुंबीयांना चिंता लागून राहिली होती. याचवेळी शेजारील शेतकरी भाऊसाहेब सोनवणे हे त्यांच्या शेतात जात असतांना त्यांना राजाराम सोनवणे यांचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तातडीने पोलीस पाटील बाळकृष्ण पवार यांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस पाटील पवार व शेतकरी घटनास्थळी गेले. सदर शेतकऱ्याची डावी मांडी व उजव्या हाताचे हिंस्त्र प्राण्याने लचके तोडलेले असल्याचे दिसून आले. पोलीस पाटील पवार यांनी घटनेची माहिती सिन्नर पोलिसांना दिल्यानंतर मृतदेह सिन्नर नगरपरिषदेच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला असल्याचे सांगितले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले आहे. याच भागात मधुकर शिंदे यांच्या पोल्ट्री शेडजवळ झडप घालताना बिबट्या दिसून आला होता. त्यामुळे सोनवणे यांच्यावर बिबट्यानेच हल्ला करुन त्यांना ठार केले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जी. व्ही. सारुक्ते अधिक तपास करीत आहेत.
-------------------------
शेतकऱ्यांमध्ये घबराट
मयत सोनवणे यांच्या डाव्या मांडीचे व उजव्या हाताचे मोठ्या प्रमाणात लचके तोडल्याचे दिसून आले. घटनेची माहिती सिन्नरच्या वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, वनमंडळ अधिकारी अनिल साळवे, अनिल पवार, वत्सला कांगणे, पोपट बिन्नर, गोरख पाटील, बालम शेख यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरात बिबट्याचे ठसे किंवा काही मागमूस मिळतो का याचा शोध घेतला. दोन ठिकाणी बांधावर रक्त पडलेले दिसून आले. हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्यानेच सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. दरम्यान, सिन्नरला पिंजऱ्याची कमतरता असल्याने नाशिक येथून पिंजरा बोलावून या परिसरात पिंजरा लावण्याचे काम सुरु होते. या घटनेमुळे धोंडवीरनगर परिसरातील काळे मळ्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
--------------------
‘सदर शेतकऱ्यावर हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचे दिसून येते. डावी मांडी फाडली असून उजव्या हाताचे लचके तोडण्यात आले आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. या परिसरात तीन -चार दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बिबट्यावर संशय आहे. तथापि, जखमेचे स्वॅब घेण्यात आले असून ते तपासणीसाठी हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.
- प्रवीण सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर
---------------
(१२ राजाराम सोनवणे)
===Photopath===
120321\12nsk_15_12032021_13.jpg
===Caption===
१२ राजाराम सोनवणे