बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 22:20 IST2021-10-13T22:20:22+5:302021-10-13T22:20:50+5:30
वाडीव-हे : शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी
वाडीव-हे : शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बुधवारी दुपारी वाडीव-हे येथील शेतकरी गणपत दिवटे यांच्या शेतात भात निंदनीचे काम सुरू होते. चार ते पाच मजूर काम करत असताना सकाळी दहा वाजेच्या सुमारास भाताच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेतमजूर प्रल्हाद खानजोडे या वीस वर्षीय कामगारावर हल्ला चढविला. पंजाने त्याच्या पायावर प्रहार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरून जाऊन त्याने आरडाओरड केली.
या वेळी शेजारी काम करणाऱ्या इतर कामगारांनीदेखील त्याच्याकडे धाव घेत ओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. कामगाराच्या पायाला जखम झाल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या वेळी शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.
याअगोदर याच मळ्यात बिबट्याने काही श्वानांना भक्ष्य केले आहे. तरस, कोल्हे असे जंगली श्वापद ही या ठिकाणी आहेत. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी घाबरले असून, वनविभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे.
- गणपत कोंडाजी दिवटे, शेतकरी, वाडीव-हे.