आघाडीच्या निर्णयाने कॉँग्रेसमध्ये धुसफूस
By Admin | Updated: October 25, 2016 01:24 IST2016-10-25T01:23:22+5:302016-10-25T01:24:59+5:30
इच्छुकांची कोंडी : प्रदेशस्तरावर मांडणार गाऱ्हाणे

आघाडीच्या निर्णयाने कॉँग्रेसमध्ये धुसफूस
नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक स्तरावर कॉँग्रेस - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी आता या निर्णयामुळे कॉँग्रेस पक्षात धुसफूस वाढली आहे. पदाधिकाऱ्यांनी ब्लॉक स्तरावर कोणतीही चर्चा न करता निर्णय घेतल्याने प्रदेशस्तरावर गाऱ्हाणे मांडण्याचीही तयारी काहींनी चालविली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी कॉँग्रेस व राष्ट्रवादीने समविचारी पक्षांना सोबत घेऊन आघाडी करावी, असा निर्णय शनिवारी (दि.२२) कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते उत्तमराव कांबळे यांच्या निवासस्थानी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर आघाडीवर शिक्कामोर्तब करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींवर सोपविण्यात आला. मात्र, दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आघाडी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. प्रामुख्याने, कॉँग्रेस पक्षात इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर प्रकट होताना दिसून येत आहे.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास काही प्रस्थापितांना त्याचा फायदा होणार असला तरी नव्याने उमेदवारी करू पाहणाऱ्या इच्छुकांच्या स्वप्नांना ब्रेक बसला आहे.
भाजपाने मागील पंचवार्षिक काळात प्रभागात स्वत:चे केडर वाढविण्याबरोबरच संघटन बळकट करण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढविली होती आणि १४ जागा कायम राखल्या होत्या. त्याच धर्तीवर कॉँग्रेसनेही आपले संघटन वाढविण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढवावी, असा एक मतप्रवाह आहे तर आघाडी केल्यास सेना-भाजपाचा उधळलेला वारू सहज रोखणे शक्य असल्याचा दावा प्रस्थापित गटाकडून केला जात आहे. दरम्यान, कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ब्लॉक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर आघाडी करण्याचा घेतलेला निर्णय अनेकांना रुचला नसून त्याबाबत प्रदेश नेत्यांच्या कानावर गाऱ्हाणे घालण्याची तयारी काहींनी चालविली आहे. काही पदाधिकारी व प्रस्थापितांनी आपल्या सोईच्या प्रभागासाठी आघाडीचा निर्णय घेतल्याचाही आरोप ऐकायला मिळत आहे. (प्रतिनिधी)