नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:44 IST2018-09-25T00:43:58+5:302018-09-25T00:44:26+5:30
रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत.

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर प्रवाशांना सुविधा
नाशिकरोड : रेल्वेस्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाच्या वतीने विविध सोयीसुविधा पुरविण्यात येत आहेत. मोबाइलचा वाढता वापर व गरज लक्षात घेऊन प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील सर्व प्रतीक्षागृहात व प्लॅटफॉर्म एकवर आरक्षण सूची फलकाजवळ असे एकूण सहा यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट लावण्यात आले आहे. एका यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंटवर एकावेळी दहा मोबाइल चार्जिंग होण्याची व्यवस्था आहे.
प्रवासादरम्यान मोबाइल चार्जिंग करण्याची मोठी गरज होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकांवरील सर्व प्रवासी प्रतीक्षागृह व प्लॅटफॉर्मवर प्लगपीन सॉकेट उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी एकच चार्जर लागत असल्याने संबंधितांचाच मोबाइल चार्ज होऊ शकत होता. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.
रेल्वेस्थानकावरील पुरुष-स्त्री प्रवासी स्वतंत्र वातानुकूलित प्रतीक्षालय, सर्वसाधारण व स्लिपर कोचचे प्रतीक्षालय तसेच प्लॅटफॉर्म एकवर आरक्षण सूची फलकाजवळ रेल्वे प्रशासनाकडून एकूण सहा यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट बसविण्यात आले आहे. एका यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंटवर एकावेळी १० मोबाइल चार्जिंग होण्याची व्यवस्था असून तेथे मोबाइल ठेवण्याचीदेखील व्यवस्था आहे. यामुळे प्रवाशांना मोबाइल चार्जिंग करण्यासाठी लावला असताना मोबाइल पकडून उभे राहण्याची गरज नाही. यूएसबी चार्जिंग पॉइंट लावून दिल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे.
जास्त पॉइंट लावण्याची गरज
नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन एक-दोन व तीन क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर, रेल्वे पोलीस ठाणे, आरक्षण- तिकीट घर, पार्सल आदी गर्दीच्या ठिकाणी जास्त यूएसबी मोबाइल चार्जिंग पॉइंट लावण्याची गरज आहे.