मतदारयादीतील ४५ लाख नावांना चेहऱ्याची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:52+5:302021-06-26T04:11:52+5:30
नाशिक : बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदारयाद्या अद्ययावतीकरणाला प्राधान्य दिले जात असून मयत आणि दुबार नावे वगळण्याच्या मोहिमेबरोबरच मतदारांची ...

मतदारयादीतील ४५ लाख नावांना चेहऱ्याची ओळख
नाशिक : बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी मतदारयाद्या अद्ययावतीकरणाला प्राधान्य दिले जात असून मयत आणि दुबार नावे वगळण्याच्या मोहिमेबरोबरच मतदारांची छायाचित्रे समाविष्ट करण्याची देखील मोहीम सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ लाख मतदारांची छायाचित्रे यादीत समाविष्ट करण्यात आली असून सहा मतदारसंघांतील शंभर टक्के छायाचित्रे अपडेट झाल्याची माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मतदारयाद्या पडताळणी मोहीम राबविण्यात येत आहे. यादीतील दुबार आणि मयत मतदारांची नावे वगळण्यात येण्याबरोबरच नव मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात आली. याकामी हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईदेखील करण्यात आली होती. प्रत्येक मतदारसंघात राबविण्यात आलेल्या या मोहिमेत अनेक दुबार नावे वगळण्यात आल्याने यादीतील नावे कमीदेखील झाली होती. मात्र, त्यामुळे यादीचे शुद्धीकरण झाले आहे. याबरोबरच यादीत मतदारांची छायाचित्रेदेखील समाविष्ट करण्याची मोहीम सुरू असून आतापर्यंत ४५ लाख ५६ हजार ६१२ मतदारांच्या छायाचित्राचा यादीत समावेश करण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाने मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारयादीच्या शुद्धीकरणाचे काम सुरू केले आहे. त्याअंतर्गत मतदारयाद्या छायाचित्रासह अद्ययावत केल्या जात आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेतून सहा मतदारसंघांचे काम शंभर टक्के पूर्ण झाले असून उर्वरित नऊ मतदारसंघांतील ७ हजार ७१७ मतदारांचे छायाचित्रासह यादी पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्याला येत्या आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान असून त्यानुसार नियोजनदेखील करण्यात आल्याचा दावा निवडणूक शाखेने केला आहे.
जिल्ह्यातील नांदगाव, मालेगाव बाह्य, निफाड, नाशिक मध्य, नाशिक पूर्व व येवला या सहा मतदारसंघांत शंभर टक्के यादी शुद्धीकरण करण्यात आली आहे. या मतदारसंघांमध्ये असलेल्या मतदारयादीला छायाचित्रांची ओळख मिळाली आहे. इतर ९ मतदारसंघांत अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे.
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातच जवळपास ४ हजार मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मालेगाव मध्य - ३ हजार ९५९, बागलाण - १ हजार ४३१, कळवण - ९३९, इगतपुरी - ५४९, चांदवड - २८८, देवळाली - २८५
दिंडोरी - १४४, नाशिक पश्चिम - १०१, सिन्नर - २० याप्रमाणे एकूण ७ हजार ७१६ यादी अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे.
--इन्फो--
यादी अद्ययावत करण्यात नाशिक जिल्हा राज्यात सातव्या क्रमांकावर असून ज्या मतदारांची छायाचित्रे मतदारयादीत नाहीत, अशा मतदारांकडून छायाचित्र त्वरित उपलब्ध करून मतदार यादी अद्ययावत करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून दिलेल्या आहेत. त्यानुसार मतदार यादी अपडेट करण्याचे काम ७८.१८ टक्के पूर्ण झाले आहे.