श्रेणीसुधार गुणपत्रिका मिळवण्यासाठी विद्यार्थांना विकल्प सादर करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:13 IST2021-04-06T04:13:51+5:302021-04-06T04:13:51+5:30
नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० श्रेणीसुधार परीक्षेची गुणपत्रिका मिळवण्यासाठी विकल्प सादर करण्यास महाराष्ट्र राज्य ...

श्रेणीसुधार गुणपत्रिका मिळवण्यासाठी विद्यार्थांना विकल्प सादर करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२० श्रेणीसुधार परीक्षेची गुणपत्रिका मिळवण्यासाठी विकल्प सादर करण्यास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचा विकल्प सादर करुन सुधारित गुणपत्रिकेची मागणी केल्यास सुधारित गुणपत्रिका बदलून देण्याचा कालावधी एक महिन्याऐवजी सहा महिन्यांपर्यंत वाढविण्यात आला होता. मात्र, राज्यातील कोविड -१९ विषाणू प्रसाराच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी-मार्च २०२० उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेला श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ झालेले विद्यार्थी काही अपरिहार्य कारणास्तव सहा महिन्यांच्या कालावधीत विकल्प सादर करु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांसाठी केवळ २०२०-२१ या वर्षासाठी खास बाब म्हणून विकल्प सादर करण्यास दिनांक ३० एप्रिल २०२१पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार, फेब्रुवारी-मार्च २०२०मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेंतर्गत प्रविष्ठ झालेले विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक / प्राचार्य, सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी व विभागीय मंडळांशी संपर्क साधून ३० एप्रिलपर्यंत योग्य तो पर्याय निवडून हवा तो विकल्प विभागीय मंडळाला सादर करण्याच्या सूचना राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केल्या आहेत.