बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

By Admin | Updated: May 31, 2014 00:18 IST2014-05-31T00:14:57+5:302014-05-31T00:18:35+5:30

व्यवसाय प्रशिक्षणाच्या नावाखाली गंडा

Explain the type of fraud of unemployed youth | बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

बेरोजगार युवकांच्या फसवणुकीचा प्रकार उघड

व्यवसाय प्रशिक्षणाच्या नावाखाली गंडा

सिडको : व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे जिल्हानिहाय नवीन प्रशिक्षण केंद्राच्या कामकाजासाठी जिल्हा समन्वयक अधिकारी व इतर पदे भरावयाची असल्याबाबत महाराष्ट्रभर वृत्तपत्रात जाहिराती देऊन बेरोजगार युवकांची फसवणूक करण्याचा प्रकार नुकताच बेरोजगार युवकांनीच उघडकीस आणला.
पाथर्डीफाटा येथील प्रशांतनगर परिसरात साईश्रद्धा रो-हाऊसमध्ये महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे विभागीय कार्यालय उघडण्यात आले आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण महाराष्ट्रभर वृत्तपत्रात जाहिराती देऊन काही पदे भरावयाची असल्याचे नमूद करण्यात आले होते. यात जिल्हा समन्वयक अधिकारी, प्रकल्प अधिकारी कार्यालय, निरीक्षक (नाशिक कार्यालयासाठी) सह. कार्यालय, नाशिक या पदांसाठी प्रत्येक जिल्हानिहाय कामकाज करण्यासाठी पदे भरावयाची असल्याचे जाहिरातीत प्रसिद्ध केले. तसेच ३० मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नाशिकच्या पाथर्डी फाटा येथील विभागीय मुख्य कार्यालयात इच्छुक उमेदवारांना भेटण्यासाठी येण्याचे नमूद करण्यात आले होते. त्यानुसार आज महाराष्ट्रातील नाशिकसह जालना, अमळनेर, परभणी, औरंगाबाद, बीड, सोलापूर, जळगाव, भुसावळ, यावल आदिंसह महाराष्ट्रातील सुमारे दोनशेहून अधिक बेरोजगार मुलाखतीसाठी दाखल झाले होते. परंतु मुलाखतीच्या वेळी संबंधितांनी सुरुवातीस प्रत्येकाने शंभर रुपये भरण्यास सांगितले. यानुसार बहुतांशी बेरोजगारांनी शंभर रुपये भरले. तसेच यानंतर संबंधितांनी बेरोजगार युवकांना जाहिरातीत दिलेल्या पदासाठी एक ते दीड लाख रुपये प्रत्येकी खर्च असल्याचे सांगितले. परंतु जालना येथील विधी शाखेची पदवी असलेल्या किशोर गोफणे या बेरोजगार युवकास आपली काहीतरी फसवणूक होत असल्याची शंका आली. यानंतर सर्व बेरोजगार युवक एकत्र आले व त्यांनी या सार्‍या गोष्टीचा भंडाफोड केला.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली असता सदरचे कार्यालय हे शासन मान्यताप्राप्त नसून कार्यालय हे शासनाचे असल्याचे भासवून बेरोजगारांची फसवणूक करण्याचा प्रकार बेरोजगार युवकांनीच उघडकीस आणला. यावेळी सतीश दुसाने, महेश तायडे, रोहिदास गांगवे, मिलिंद धडे, वैभव दुसाने, राहुल मोरे, एकनाथ बडोगे आदिंसह दीडशे ते दोनशे युवक उपस्थित होते. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करीत बेरोजगार युवकांनी दिलेले प्रत्येकी शंभर रुपये हे संस्थाचालकाने परत दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Explain the type of fraud of unemployed youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.