प्रयोगशील शेतकऱ्याला खारवट जमिनीने केले लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:34+5:302021-09-26T04:15:34+5:30

जळगाव नेऊर : शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो, त्यात जमीन चांगली असली ...

Experimental farmer made lakhs of salty land | प्रयोगशील शेतकऱ्याला खारवट जमिनीने केले लखपती

प्रयोगशील शेतकऱ्याला खारवट जमिनीने केले लखपती

जळगाव नेऊर : शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग राबवून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो, त्यात जमीन चांगली असली तर कष्टही कमी असतात आणि इतर खर्चही कमी येतो; पण जळगाव नेऊर येथील प्रयोगशील शेतकरी शांताराम शिंदे यांची वडिलोपार्जित अडीच एकर शेती आणि तीही खारवट, एकदा पाणी भरले की महिनाभर पाणी लागत नाही. शिंदे यांनी आपल्या शेतात कांदा, टोमॅटो, गहू आदी पिके घेऊन बघितली; पण जाड व खारवट जमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्याने पाहिजे असे उत्पादन न निघाल्याने त्यातून खर्चदेखील वसूल होत नव्हता, यातून वैतागलेल्या शांताराम शिंदे यांनी आपल्या एक एकर शेतात चार वर्षांपूर्वी ४०० डाळिंबाच्या झाडांची लागवड केली, गेली अनेक वर्षांपासून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागत असून, मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग, मर रोगाने आक्रमण केल्याने अनेक शेतकऱ्यांनी डाळिंब बागेवर कुऱ्हाड चालवली; पण शांताराम शिंदे या प्रयोगशील तरुण शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर खारवट (जाड) जमिनीवर डाळिंब बाग फुलवून सलग दुसऱ्या वर्षी आपल्या डाळिंब बागेतून पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

त्यांच्या डाळिंब बागेच्या एका क्रेटसला अकरा हजार भाव मिळाल्याने त्यांनी डाळिंब बागेसाठी केलेली मेहनत फळाला आली आहे. शिंदे यांची जळगाव नेऊर येथे वडिलोपार्जित अडीच एकर शेती असून, एक एकर क्षेत्रावर डाळिंब बाग आहे. त्यांनी दीड एकरावर मका लागवड केली आहे. पहिल्या वर्षी अडीच लाख उत्पन्न मिळाले असून, दुसऱ्या वर्षी पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न घेतले, तर तिसऱ्या वर्षीही त्यांना दहा लाखांच्या आसपास उत्पन्न मिळण्याची आशा होती; पण डाळिंबाला मिळालेल्या भावातून त्यांना तब्बल पंधरा लाखांचे उत्पन्न मिळाले. कसोटीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या डाळिंब बागेवर नांगर चालवला; पण शिंदे यांनी यावर मात करून कृषी सेवा केंद्र चालकाच्या मार्गदर्शनानुसार व्यवस्थित नियोजन करून खते, औषधांच्या मात्रा देऊन बाग फुलविली. त्यासाठी त्यांचा एक ते दीड लाख रुपये खर्च झालेला असून, परिसरातील तरुण शेतकऱ्यांना एक आदर्श बनला आहे.

कोट....

माझी वडिलोपार्जित अडीच एकर जमीन असून, या अगोदर द्राक्ष, कांदा पिके घेऊन बघितली; पण जमीन खारवट असल्याने पाहिजे तसे उत्पादन निघत नव्हते. त्यामुळे एक एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली असून, दीड एकरावर खरिपाची पिके मका, सोयाबीन घेत असतो. मागील दोन वर्षांपासून डाळिंबातून योग्य नियोजन करून कृषी सेवा केंद्र चालकाच्या मार्गदर्शनाखाली डाळिंबातून मागील वर्षाप्रमाणे यावर्षीही पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे.

-शांताराम शिंदे, डाळिंब उत्पादक, जळगाव नेऊर

फोटो- २५ शांताराम शिंदे

फाेटो- २५ शांताराम शिंदे

250921\25nsk_23_25092021_13.jpg

फोटो- २५ शांताराम शिंदे 

Web Title: Experimental farmer made lakhs of salty land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.