सेस निधी खर्चावरुन सत्ताधारी विरोधक आमनेसामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 19:55 IST2018-08-14T19:54:39+5:302018-08-14T19:55:53+5:30
सिन्नर पंचायत समितीत सेस निधी खर्चावरुन शिवसेना व भाजपा सदस्यांत बैठकीत शाब्दिक चकमक उडाली. निवडून आल्यानंतर गणात सेस निधीतून कोणतेही काम झाले नाही. सेस निधीतून अव्वाच्या सव्वा वस्तूंची खरेदी झाली. आता किमान उरलेल्या पैशातून गणांमध्ये कामे करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनी बैठकीत केली.

सेस निधी खर्चावरुन सत्ताधारी विरोधक आमनेसामने
पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची मासिक बैठक पार पडली. बैठकीस व्यासपिठावर उपसभापती जगन्नाथ भाबड, शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे, भाजपचे गटनेते विजय गडाख, सदस्य रवींद्र पगार, तातु जगताप, संगीता पावसे, सुमन बर्डे, योगिता कांदळकर, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार आदी उपस्थित होते. गणात आतापर्यंत कोणतीही कामे झाली नाहीत. सेस निधी गणांतील कामांसाठी खर्च करणे गरजेचे होते. तथापि, त्यातून दुसराच खर्च केला. त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत निवडून आलो नसतो तर बरे झाले असते, अशा शब्दात पगार यांनी संताप व्यक्त केला. त्यास आक्षेप घेत गटनेते कातकाडे यांनी खर्चास बैठकीत मंजुरी देण्यात आली असून संबंधित कामांवर चर्चा झाली आहे. त्यामुळे दुरूपयोग झाला हा शब्द चुकीचा असून सदस्य पगार यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. खर्चावर अंकुश नसल्याचे आपले म्हणणे असल्याचे पगार यांनी सांंगितल्यावर चर्चेला पूर्णविराम मिळाला. वावीसह ११ गावे योजनेचा विद्युत जलपंप जळाल्याने गेल्या बारा दिवसांपासून या योजनेचे पाणी बंद असल्याचा विषय रवींद्र पगार यांनी सभागृहात मांडला. या समितीच्या बैठकीला गणातील पदसिध्द सदस्यांना बैठकीस बोलावले जात नाही. पाणीपटटीची वसुलीही नाही त्याची दखल घेण्याची मागणी केली. संबंधित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपट्टी वसुली करणे गरजेचे असल्याचे गटविकास अधिकारी पगार यांनी सांगितले.