सरकारी रुग्णालयांना सूट, खासगी डॉक्टरांची मात्र लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:36 IST2021-01-13T04:36:17+5:302021-01-13T04:36:17+5:30
नाशिक : खासगी रुग्णालयांना नियमांची सक्ती करून अडवणूक करणाऱ्या महापालिका आणि अन्य शासकीय रुग्णालयांच्या बाबतीत ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती ...

सरकारी रुग्णालयांना सूट, खासगी डॉक्टरांची मात्र लूट
नाशिक : खासगी रुग्णालयांना नियमांची सक्ती करून अडवणूक करणाऱ्या महापालिका आणि अन्य शासकीय रुग्णालयांच्या बाबतीत ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती स्पष्ट झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे फायर ऑडिट नाही की इलेक्ट्रीकल ऑडिट! महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तर ‘इलेक्ट्रीकल ऑडिट’ हा शब्दच जणू प्रथम ऐकला. अशा स्थितीत स्वत:च्या वैद्यकीय आस्थापनेत सुधारणा करण्याऐवजी केवळ खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची अडवणूक करणे कितपत योग्य अशा भावना आता व्यक्त होऊ लागल्या आहे.
भंडारा येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात दहा बालके आगीत होरपळून गेल्यानंतर रुग्णालयांच्या सुुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात फायर ऑडिट तर झालेले नाहीच शिवाय तेथील सिलिंडरदेखील मुदत संपलेले आहेत. या रुग्णालयांमध्ये हजारो रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय येत असतात. महापालिकेच्या मुख्य चार रुग्णालयातदेखील अशीच अवस्था आहे. त्याठिकाणी महापालिकेने कधी लक्ष पुरवले नाही. मात्र, गेल्या काही वर्षांपासून केवळ खासगी डॉक्टरांनाच महापालिकेकडून लक्ष केले गेले. मुळातच सुरक्षिततेचे असे सर्वच विषय थंड असतात; परंतु दुर्घटना घडल्यानंतर मात्र त्याचे गांभीर्य दाखवून खासगी यंत्रणांचीच छळवणूक केली जाते. कोलकाता येथील रुग्णालयात लागलेली आगीचे निमित्त करून केंद्र आणि राज्य शासनाने केलेल्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नाशिकमध्ये खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची जी छळवणूक करण्यात आली ते अद्यापही खासगी वैद्यकीय व्यावसायिक विसरू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांना फायर ऑडिट करण्याची आणि त्यानंतर व्यवसाय परवानगीच्या नूतनीकरणासाठी एनओसीची सक्ती केेल्यानंतर खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय व्यावसायिकांचा अक्षरश: छळ आरंभला तो अजूनही फार थांबलेला नाही.
इन्फो...
शहरातील अनेक खासगी रुग्णालयांनी कसे तरी महापालिकेच्या निकषांप्रमाणे बदल केले आणि लाखो रुपयांचा खर्चदेखील केला; परंतु हे सर्व होत असताना जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा महापालिकेच्या रुग्णालयांचे काय, हा विषय चर्चेत हेाताच. आता या उणिवा स्पष्ट झाल्याने शासकीय नियम फक्त खासगी क्षेत्रासाठीच असतात काय, शासकीय यंत्रणांना त्यातून सूट असते काय, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आता अशाप्रकारचे नियम सर्वप्रथम शासकीय यंत्रणांनी पाळले पाहिजेत आणि मगच खासगी क्षेत्रांकडे वळले पाहिजे, अशी भावनादेखील व्यक्त होत आहे.
इन्फो...
अनेक डॉक्टरांनी व्यवसायच केले बंद
नाशिक महापालिकेच्या छळवणूक आणि आर्थिक अडचणींमुळे अनेक प्रतिष्ठित व ज्येष्ठ खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपले व्यवसायच बंद केले आहेत. विशिष्ट एजन्सीकडूनच ऑडिट करून घेणे आणि या एजन्सीनेदेखील विशिष्ट कंपन्यांकडून अग्निशमन साहित्य खरेदीची सक्ती करणे, एखाद्या जुन्या रुग्णालयाला वर्षानुवर्षे परवानगी असताना नंतर मात्र दोन बाजूने जिने नाहीत, सामाजिक अंतर पुरेसे नाही, अशाप्रकारच्या नियमांचा पूर्वलक्षी पद्धतीने अंमल करून लाखो रुपयांच्या हार्डशिप भरण्यासदेखील भाग पाडण्यात आले.