कार्यकारिणीविना कारभार : कार्यालयात शुकशुकाट, कार्यकर्ते सैरभैर

By Admin | Updated: July 21, 2015 00:42 IST2015-07-21T00:42:15+5:302015-07-21T00:42:36+5:30

वर्ष लोटूनही शहर कॉँग्रेस ‘प्रभारी’च्या हाती

Executive without office: Shukkukkat at office, activists sirbhayer | कार्यकारिणीविना कारभार : कार्यालयात शुकशुकाट, कार्यकर्ते सैरभैर

कार्यकारिणीविना कारभार : कार्यालयात शुकशुकाट, कार्यकर्ते सैरभैर

नाशिक : बरोबर एक वर्षापूर्वी दि. २१ जुलै रोजी शहर कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार शरद अहेर यांनी समारंभपूर्वक स्वीकारला; परंतु वर्ष लोटूनही शहर कॉँग्रेसचा कारभार ‘प्रभारी’च्याच हाती असून, कार्यकारिणीही गठित न झाल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. युती सरकारविरोधात मुंबईत कॉँग्रेससह विरोधक आक्रमक झालेले असताना शहरातील महात्मा गांधी मार्गावरील कॉँग्रेस भवनात मात्र शुकशुकाट दिसत असल्याने ज्येष्ठ कॉँग्रेसजनांमध्ये नाराजीचा सूर आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शहर कॉँग्रेसच्या अध्यक्ष अश्विनी बोरस्ते यांना गटबाजीचा फटका बसला आणि त्यांना स्वत:हून राजीनामा देत पायउतार व्हावे लागले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहर कॉँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या हाती सोपवावी यावर बराच खल होऊनही एकमत न होऊ शकल्याने प्रदेश कॉँग्रेसने शहराध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार शरद अहेर यांच्याकडे सोपविला. त्यानंतर दि. २१ जुलै २०१४ रोजी शरद अहेर यांनी खास मेळाव्याचे आयोजन करत ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत प्रभारी कार्यभार स्वीकारला. यावेळी अहेर यांनी विधानसभा निवडणुकीत टष्ट्वेंटी-टष्ट्वेंटी खेळत पक्षाला विजय मिळवून देण्याचे आव्हान स्वीकारले होते; परंतु विधानसभा निवडणुकीतही कॉँग्रेसने सपाटून मार खाल्ला. दरम्यान, शरद अहेर यांच्याकडून शहर कार्यकारिणीची घोषणा होईल आणि मरगळलेल्या कॉँग्रेसमध्ये नवचैतन्य प्राप्त होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत असताना आता तब्बल वर्ष लोटले तरी कार्यकारिणीला मुहूर्त लागू शकलेला नाही. कार्यकारिणीच गठित झाली नसल्याने कार्यकर्तेही सैरभैर झाले असून, काही कार्यकर्ते सेना-भाजपात प्रवेशकर्ते झाले आहेत. पक्षाकडूनही शहरात ठोस असा कोणताही कार्यक्रम राबविला जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे. त्यातच अद्याप अध्यक्षपदाचा कारभार ‘प्रभारी’च्याच हाती एकवटल्याने अनेकांनी कॉँग्रेस भवनकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे कॉँग्रेस कार्यालयात शुकशुकाटच दिसून येतो. (प्रतिनिधी)

Web Title: Executive without office: Shukkukkat at office, activists sirbhayer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.