कोरोना काळात जास्तीचे बिल आकारणी डॉक्टरला भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:16 IST2021-09-18T04:16:45+5:302021-09-18T04:16:45+5:30
पंचवटी : कोविड काळात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची माहिती न देता कोरोना रुग्णांकडून जास्त बिल आकारण्यासोबतच पूर्ण ...

कोरोना काळात जास्तीचे बिल आकारणी डॉक्टरला भोवले
पंचवटी : कोविड काळात रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची माहिती न देता कोरोना रुग्णांकडून जास्त बिल आकारण्यासोबतच पूर्ण बिल सादर न करता खाटांची माहिती देण्यास टाळाटाळ केली म्हणून पंचवटी कारंजा येथील रामालयम हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. शोधन गोंदकर यांच्याविरोधात साथरोग प्रतिबंध अधिनियम व आपत्ती व्यवस्थापनचे अधिनियम कलमान्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय देवकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली आहे. कोरोना दुसऱ्या लाटेत चार महिन्यांपूर्वी एप्रिलमध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडील अधिसूचनेनुसार महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियमांमधील दहाव्या नियमानुसार मनपा आयुक्तांना सक्षम अधिकारी घोषित केलेले असून, त्यांना प्राप्त अधिकारानुसार मनपा कार्यक्षेत्रासाठी इन्सिइन्ट कमांडर म्हणून वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना संनित्रक म्हणून नेमण्यात आले आहे. त्यानुसार आयुक्तांच्या मुख्यलेखा परीक्षक कार्यालयाने २३ जुलैला दिलेल्या चौकशी आदेशानुसार डॉ. विजय देवकर यांनी चौकशी करून डॉ. शोधन गोंदकर यांच्याविरोधात फिर्याद दिली असून त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.