फाळके स्मारकातही आता ...लाइट...कॅमेरा ॲक्शन...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:17+5:302021-09-03T04:16:17+5:30
नाशिक महापालिकेच्या वतीने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचे नूतनीकरण करून ते कायमस्वरूपी पर्यटनस्थळ व्हावे यासाठी पीपीपी तत्त्वावर प्रयत्न केले ...

फाळके स्मारकातही आता ...लाइट...कॅमेरा ॲक्शन...!
नाशिक महापालिकेच्या वतीने चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचे नूतनीकरण करून ते कायमस्वरूपी पर्यटनस्थळ व्हावे यासाठी पीपीपी तत्त्वावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मागवण्यात आलेल्या स्वारस्य अभिकर्ता निविदेत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओबरोबर मुंबईतील मंत्रा कंपनीने स्वारस्य दाखवले असून गुरुवारी(दि. २) याबाबत आयुक्तांच्या दालनात सादरीकरण करण्यात आले.
महापालिकेने वीस वर्षांपूर्वी पांडव लेणींच्या पायथ्याशी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे स्मारक साकारले आहे. नाशिकचे भूमिपुत्र असलेल्या फाळके स्मारकाचे सुरुवातीचे काही दिवस चांगले चालले. मात्र, नंतर प्रतिसाद घटला आणि पर्यटकांनी पाठ फिरवल्यानंतर महापालिकेनेदेखील अधिक दुर्लक्ष केले. त्यामुळे स्मारकाची रया गेली. आता, त्याचे नूतनीकरण आणि देखभाल दुरुस्ती खासगीकरणातून महापालिकेला आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहे. त्यानुसार मागवण्यात आलेल्या निविदांपैकी दोन पात्रताधारकांनी महापालिकेत सादरीकरण केले. अर्थातच भव्यदिव्य नेपथ्याची भुरळ घालणाऱ्या नितीन चंद्रकात देसाई यांनीही नियमानुसार प्रस्ताव सादर केले आहे.
नव्या प्रकल्पात स्थानिक कलावंतांसाठी व्यासपीठ उभारण्यात येणार आहेच, परंतु सुशोभीकरण करून चित्रनगरीच उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी फाळके यांच्या काळापासून चित्रीकरणात झालेले बदल दर्शवले जातील. प्रत्यक्ष चित्रीकरणाची माहिती देण्याची व्यवस्थादेखील असेल. काही शिक्षणक्रमदेखील सुरू करण्यात येणार आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातील वाटादेखील महापालिकेला मिळेल. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओजच्या चित्रपटसृष्टीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा विकास करण्याची देसाई यांची इच्छा आहे. दरम्यान, एन.डी. स्टुडिओबरोबर मुंबईतील मंत्रा कंपनीतर्फे गुरुवारी याबाबत सादरीकरण करण्यात आले. मात्र, दोन्ही संस्थांना काही त्रुटी दूर करून पुन्हा सादरीकरण करण्यास सांगण्यात आले आहे.
इन्फो...
चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचा जन्म ३० एप्रिल १८७० रोजी जन्म झाला. ३० एप्रिल २०२० हा त्यांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंती दिन होता. फाळके स्मारकाला झळाळी देण्यासाठी महापाैर सतीश कुलकर्णी आणि आयुक्त कैलास जाधव यांनी नितीन देसाई, एकता कपूर यांचीदेखील भेट घेतली होती. त्याला आता मूर्त स्वरूप येताना दिसत आहे.