रेड्यांच्या मिरवणुकीतही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाचा' गजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 21:57 IST2025-10-22T21:56:38+5:302025-10-22T21:57:23+5:30
ढोल ताशांच्या तालावर निघाली पारंपरिक मिरवणूक

रेड्यांच्या मिरवणुकीतही 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्लाचा' गजर
संदीप झिरवाळ
नाशिक- नाशिक पोलिसांनी सध्या राजकीय आणि सराईत गुन्हेगारांच्या विरोधात कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या गुन्हेगारांना जेरबंद करून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला अशा घोषणा देत न्यायालयात आणण्यात येते त्याचे प्रतिबिंब आज नाशिकमध्ये बलप्रतिपदेनिमित्त काढण्यात आलेल्या रेड्यांच्या निवडणुकीतही दिसून आले
पंचवटी परिसरात आज सायंकाळी ढोल ताशांचा गजर करत तसेच फटाक्यांची आतषबाजी करत रेड्यांची मिरवणूक काढण्यात आली. सवाद्य काढलेल्या मिरवणुकीत शेकडो दुग्ध व्यवसायिक भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या रेड्यांवर चक्क नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे रंगवण्यात आले होते. इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांनीही तशा घोषणा दिल्या.
लक्ष्मीपूजन दिवाळी सणानंतर दुसऱ्या दिवशी येणाऱ्या (पाडवा) बलिप्रतिपदेला नाशिक शहरात मध्ये रेडयांची वाजत गाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. आज सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात रंगीबेरंगी फुलांची व गुलाल उधळण करत फटाके वाजवून दुग्ध व्यवसायिकांनी रेड्यांचे विधिवत पूजन करत त्यांच्या गळ्यात फुलांचे हार माळ घालत दर्शन घेतले व त्यानंतर मिरवणूकीला प्रारंभ झाला. पंचवटीतील वेगवेगळ्या भागातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी रेडयांना आकर्षक सजावट त्यांच्या पाठीवर विविध देवदेवतांची नावे तर काहींनी स्वतःच्या दूध डेअरी आणि आडनाव असलेले संदेश लिखित केले होते. रेडयांच्या पाठीवर काढलेले देवदेवता चित्र, तसेच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला लिहलेले संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.