Escon temple celebrated | इस्कॉन मंदिरात कोजागरी साजरी

जनरल वैद्यनगर येथील श्रीश्री राधा-मदनगोपाल (इस्कॉन) मंदिरात कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. यानिमित्त मंदिराला तसेच श्री राधा-कृष्णाची सुंदर सजावट करून सभोवताली आरास करण्यात आली होती.

ठळक मुद्देशरद पौर्णिमा महोत्सव : राधा-कृष्णाची सुंदर सजावट

नाशिक : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) यांच्या वतीने श्रीश्री राधा-मदनगोपाल मंदिरात कोजागरी तथा शरद पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली.
शरद पौर्णिमेनिमित्त मंदिराला तसेच श्री राधा-कृष्णाची सुंदर सजावट करण्यात आली होती. वेदीवर वृंदावनाचा नयनरम्य देखावा प्रस्तुत करण्यात आला होता. महोत्सवाला सकाळी ९ वाजेच्या मंगल आरतीपासूनच सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन, आरती, श्रीमद्भागवत प्रवचन झाले. संध्याकाळी झालेल्या प्रवचनात श्रीमान शिक्षाष्टकम प्रभू म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांनी हजारो गोपींसमवेत रासनृत्य केले होते. गोपींची उपासना ही सर्वश्रेष्ठ आहे व साधकाने त्यांच्यापासून शरणागती शिकायला हवी. याच दिवसापासून कार्तिक मासदेखील प्रारंभ होतो व त्यालाच दामोदर मास असेदेखील म्हणतात. प्रवचनानंतर दामोदर अष्टकम म्हणण्यात आले व उपस्थित सर्व भाविकांनी श्री श्री राधा मदनगोपाल व दामोदर यांना तुपाचे दिवे अर्पण केले.
दरम्यान, कार्तिकच्या संपूर्ण महिन्यात म्हणजेच १३ आॅक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत मंदिरात रोज सकाळी ८.१५ वाजता व संध्याकाळी ७.३० वाजता दामोदर अष्टकम व दीपदान कार्यक्रम होणार आहे. याचा नाशिककरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन दास यांनी केले आहे. शरद पौर्णिमा महोत्सवास गोपालानंद प्रभू, मुकुंदरस प्रभू, सार्वभौमकृष्ण प्रभू, जानकीनाथ प्रभू, अक्षय एडके, सुमेध पवार, भूपेंद्र, श्रीमती जेऊरकर माताजी, अंतरंगा शक्तीदेवी दासी, तुलसी सेविका माताजी उपस्थित होते.

Web Title: Escon temple celebrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.